बोगस डॉक्टरचे महिला रुग्णांशी असभ्य वर्तन

By Admin | Updated: June 7, 2014 23:51 IST2014-06-07T23:51:42+5:302014-06-07T23:51:42+5:30

येथील उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षेला छेद देत, उपस्थित कर्मचार्‍यांच्या नजरा चुकवून एक बोगस वैद्यकीय अधिकारी थेट महिला रुग्णांच्या कक्षात आला. त्याने महिलांची तपासणी सुरू केली. महिलांसोबत असभ्य

Rogue behavior of bogus doctor female patients | बोगस डॉक्टरचे महिला रुग्णांशी असभ्य वर्तन

बोगस डॉक्टरचे महिला रुग्णांशी असभ्य वर्तन

वरोरा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षेला छेद देत, उपस्थित कर्मचार्‍यांच्या नजरा चुकवून एक बोगस वैद्यकीय अधिकारी थेट महिला रुग्णांच्या कक्षात आला. त्याने महिलांची तपासणी सुरू केली. महिलांसोबत असभ्य वर्तणूक करत तब्बल एक तास तपासणी करून तो निघून गेला. त्यात काही रुग्णांकडून तपासणीच्या नावाखाली त्याने रक्कम उकळल्याची माहिती आहे.
वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात गरोदर रुग्ण, बाह्य तपासणी, अपघातातील जखमी, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण मोठय़ा प्रमाणात उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असतात. अशा रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास सुरक्षा रक्षक नेमले असून २४ तास वैद्यकीय कर्मचारी रुग्णालयात असतात. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची सकाळी नियमित तपासणी उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांकडून केली जाते. उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक व कर्मचार्‍यांना अंधारात ठेवून शुक्रवारी एक इसम वैद्यकीय अधिकारी असल्याचे सांगत चक्क स्त्री रुग्णांच्या कक्षात दाखल झाला. महिला रुग्णांनी आपल्या आरोग्यविषयक समस्या सांगण्याच्या आतच त्याने महिलांची तपासणी सुरू केली. तपासणी सुरू करताना त्याने अर्वाच्च भाषेत संभाषणही सुरू केले. हा प्रकार सुरू असताना एका रुग्णासोबत असलेल्या महिलेला संशय आला. त्या महिलेने तोतया वैद्यकीय अधिकार्‍यास खडसावल्याने त्याने रुग्णालयातून काढता पाय घेत पोबारा केला. तथाकथित वैद्यकीय अधिकारी चक्क महिला रुग्णांच्या कक्षात जाऊन त्यांची तपासणी करीत असभ्य वर्तणूक करतो. ही बाब कर्तव्यावर असणार्‍या कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येऊ नये, याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.                     (तालुका प्रतिनिधी)  

Web Title: Rogue behavior of bogus doctor female patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.