गोवरी परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ
By Admin | Updated: January 27, 2015 23:32 IST2015-01-27T23:32:11+5:302015-01-27T23:32:11+5:30
शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत रानडुकरांचे कळप धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहे. एका रात्रीतून शेतात उभे असलेले पीक नष्ट होत

गोवरी परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ
गोवरी : शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत रानडुकरांचे कळप धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहे. एका रात्रीतून शेतात उभे असलेले पीक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे बळीराजा पुरता खचला असून आर्थिक संकटात सापडला आहे.
राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेस्टर्न कोल्डफील्डच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा उत्खननानंतर निघालेली माती व त्यावर दिवसेंदिवस वाढणारे झुडुपी जंगल यामुळे याठिकाणी रानडुकरांचे कळप मोठ्या प्रमाणात आढळतात. वेकोलिगत शेतकऱ्यांच्या शेती आहे. शेतात कापूस, तूर, हरभरा, गहू आदी पीक घेतले जात. यावर्षी निसर्गाचा लहरीपणा व शेतमालाच्या दरवाढी संदर्भात मायबाप सरकारने दाखविलेली उदासिनता शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हादरुन गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस झाला. निसर्गाने ऐनवेळी दगा दिल्याने शेतकऱ्यांनी कशीबशी शेती पिकविली. दुबार- तिबार पेरणी करून शेतीवर अतोनात खर्च केला. मात्र उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला. राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, चिंचोली, बाबापूर परिसरात वेकोलिने टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमााणात झुडपी जंगलामुळे रानडुकरांचे कळप आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून विविध संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. वेकोलिने मातीच्या ढिगाऱ्यावरील झुडपी जंगल नष्ट करावे, अशी मागणी अनेकदा गावकऱ्यांनी वेकोलिकडे केली होती. मात्र वेकोलि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्यावर व्यापलेले झुडपी जंगल दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा नाहक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. रानडुकरांमुळे बळीराजा वैतागला आहे. त्यामुळे वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गोवरी येथील शेतकरी नामदेव जुनघरी, नामदेव देवाळकर, मारोती लोहे, भास्कर जुनघरी, भाऊराव रणदिवे, प्रमोद लांडे, सुनील देवाळकर यांनी केली आहे. (वार्ताहर)