वरोरा उपजिल्हा रुग्णालयात बेरोजगार युवकांची लूट

By Admin | Updated: April 1, 2016 01:25 IST2016-04-01T01:25:38+5:302016-04-01T01:25:38+5:30

जिल्हा पोलीस भरतीसाठी अनेक बेरोजगार युवकांनी आपले नामांकन भरले असून या प्रक्रियेसाठी वैद्यकीय तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.

Robbery of unemployed youth in Warora sub district hospital | वरोरा उपजिल्हा रुग्णालयात बेरोजगार युवकांची लूट

वरोरा उपजिल्हा रुग्णालयात बेरोजगार युवकांची लूट

वरिष्ठांनी लक्ष द्यावे : फिटनेस प्रमाणपत्रासाठी आर्थिक भुर्दंड
वरोरा : जिल्हा पोलीस भरतीसाठी अनेक बेरोजगार युवकांनी आपले नामांकन भरले असून या प्रक्रियेसाठी वैद्यकीय तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. परंतु, बीपीएलधारक युवकांना दाखल्यासाठी पैसे भरण्याची आवश्यकता नसतानाही वरोरा उपजिल्हा रुग्णालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे अनेक युवकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
उत्तर वैद्यकीय सेवा गरीब नागरिकास मिळावी म्हणून काही वर्षांआधी वरोरा ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात झाले. शासनाद्वारे अनेक योजनांचा लाभ नागरिकास मिळावा म्हणून अनेक उपाययोजना सेवा येथे पुरविण्यात आल्या. परंतु, येथील वैद्यकीय अधीक्षक व कर्मचाऱ्यांच्या हेकेखोर धोरणामुळे येथील नागरिकांना नेहमीच वेठीस धरण्याचे प्रकार रुग्णालयात सुरू आहे.
प्रसूतीकरीता बाहेरून येणाऱ्या महिलांकडून प्रसूतीदरम्यान नातेवाईक वर्गास वेठीस धरून हजार दीड हजार रूपये घेण्याचे प्रकार नित्याचेच झाल्याचे नागरिक बोलतात. रात्री पाळीत कार्यरत असलेले अनेक अधिकारी कर्तव्यावर येथे दिसून येत नाही. त्यामुळे अनेक वेळा रुग्णांना येथे प्रतीक्षा करत राहावे लागत असते.
त्वरित वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून शासनाने १०८ टोल फ्री क्रमांकाच्या रुग्णवाहिका उपलब्ध सुरू केल्या आहेत. परंतु, यातील डॉक्टर, कर्मचारी गैरहजर राहत असल्याने नेहमी उपचारादरम्यान ताटकळत राहावे लागते, असा प्रकार काही दिवसा अगोदर अनेक नागरिकांनी बघितला. अखेर येथील नगरसेवक राहुल जानवे यांच्याद्वारे रुग्णवाहिका पाठविण्यात आली. मात्र या विलंबामुळे रुग्णांचा बळी गेला.
सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून यासाठी अनेक युवक आपले भाग्य आजमावत आहे. यासाठी या युवकांना अनेक वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात. मात्र यात शासनाद्वारे बीपीएल धारकांना दाखल्यासाठी पैसे भरण्याकरिता वगळण्यात आले असतानाही येथील वैद्यकीय अधीक्षक हे या युवकांकडून दाखल्याचे १०० रुपये तर इतर तपासणीचे ९० रुपये असे एकूण १९० वसूल करीत असल्याने त्याचा युवकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.
एकूणच उपजिल्हा रुग्णालयातील अनेक सेवा ढेपाळलेल्या असून ठेकेदार पद्धतीमध्ये ठेवण्यात आलेले मजूरच येथे रुग्णांवर टाके मारणे, इंजेक्शन देणे असे प्रकार करताना आढळतात. तेव्हा डॉक्टरला देव मानणाऱ्या रुग्णांवर उपचार बरोबर होत नसल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगत असतात. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Robbery of unemployed youth in Warora sub district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.