कागदपत्रांसाठी दलालांकडून लूट
By Admin | Updated: October 18, 2014 23:22 IST2014-10-18T23:22:44+5:302014-10-18T23:22:44+5:30
अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयात सामान्य जनतेच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांचीही ससेहोलपट सुरू आहे. दाखले मिळविण्यासाठी

कागदपत्रांसाठी दलालांकडून लूट
टेमुर्डा : अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयात सामान्य जनतेच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांचीही ससेहोलपट सुरू आहे. दाखले मिळविण्यासाठी दलाल मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करीत असल्याने सर्वसामान्यांची चांगलीच आर्थिक लुट सुरू आहे. याकडे मात्र, कर्मचारी, अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
विद्यार्थी व शेतकऱ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. याचाच फायदा घेत अनेक विभागात दलाल सक्रीय झाले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक व विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. दाखल्यांसाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयात दररोज येरझारा मारुनही काम होत नसल्याने नागरिकांना दलालांच्या मार्फतीने काम करावे लागत आहे. अनेक दुरवरुन आलेले नागरिक ‘साहेब माझे काम करून द्या’ अशी विणवणी करतात. परंतु, त्यांना सर्व सामान्यांचे काहीच घेणे देणे नसते तर समस्या मागील साधे कारणही जाणून घेण्याचा प्रयत्न अधिकारी, कर्मचारी करीत नाही. सध्या शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यातच मुलांना महाविद्यालयीन, प्राथमिक शिक्षणासाठी विविध दाखल्यांची गरज पडत आहे. पालक कामात असल्याने विद्यार्थीच दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयाचे उबंरठे झिजवत आहेत.
तहसील कार्यालय, ग्राम पंचायत कार्यालय आदी कार्यालयात विद्यार्थी चकरा मारत असून दलाल मात्र, त्यांची सर्रास लूट करीत आहेत. कागदपत्रे त्वरित काढून देऊ, अशी बतावणी करून त्यांची आर्थिक लुट करतात. तर तहसील कार्यालय परिसरात व इतरही परिसरात काही अधिकृत अर्जनविसही विविध कागदपत्रासाठी मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत. यामध्ये काही लिपीक कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. सेतु केंद्रात काम करणारे कर्मचारीही हजारो रुपये प्रमाणपत्राच्या नावावर वसूल करीत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन लूट थांबविण्याची मागणी आहे. (वार्ताहर)