व्यावसायिकांद्वारे ग्राहकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:30 IST2021-03-23T04:30:28+5:302021-03-23T04:30:28+5:30
ब्रह्मपुरी : ग्राहकांना वस्तू मोजून देणे व वजनानुसार बरोबर पैसे घेणे, ही व्यवहाराची पद्धत आहे, पण पैसे बरोबर देऊनही ...

व्यावसायिकांद्वारे ग्राहकांची लूट
ब्रह्मपुरी : ग्राहकांना वस्तू मोजून देणे व वजनानुसार बरोबर पैसे घेणे, ही व्यवहाराची पद्धत आहे, पण पैसे बरोबर देऊनही वजनात तूट निर्माण होण्याच्या प्रकारामुळे ग्राहक लुटले जात आहेत. लहान-मोठ्या विक्रेत्यांकडून सर्रासपणे अशी लूट सुरू आहे. यावर आळा घालण्यासाठी संबंधितांनी ग्रामीण, तसेच शहरी भागात विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.
अंगणवाडी केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव
ब्रह्मपुरी : तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्राची दुरवस्था झाली असून, बालकांच्या पूर्व शालेय शिक्षणाची उपेक्षा होत आहे. तालुक्यात अनेक गावांमध्ये अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले, पण सोईसुविधा नसल्याने बालकांची गैरसोय होत आहे. गरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, या हेतूने सुरू केलेल्या अंगणवाडी केंद्राकडे दुर्लक्ष होत आहे.
व्यवसायासाठी कर्ज द्यावे
नागभीड : महिला बचत गटांची संंख्या बरीच वाढली, परंतु स्वयंरोजगार उभे करण्यासाठी अपयश येत आहे. बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नसल्याने, महिला बचतगट अत्यंत छोट्या व्यवसायात अडकले आहेत. यातून पुरेसा आर्थिक मोबदला मिळत नाही. त्यामुळे महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बचत गटांना कर्ज देण्यात यावे, अशी मागणी बचत गटातील महिलांकडून करण्यात येत आहे.
धान उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत
सावली : यंदा अल्प उत्पादन झाल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. हंगामासाठी पैशाची जुळवाजुळव करून पेरणी केली. मात्र, उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाल्यामुळे या वर्षीही स्वप्नाचा हिरमोड झाला आहे.
नियमबाह्य वाहतूक ठरतेय धोक्याची
वरोरा : गावात नियमबाह्य व विना परवाना अल्पवयीन चालक अशा प्रकारच्या वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
अनावश्यक सेवांनी मोबाइलधारक त्रस्त
चंद्रपूर : मोबाइलचा वापर सर्वत्र वाढला आहे, पण कंपन्याकडून अनावश्यक सेवांचा भडिमार ग्राहकांवर होत आहे. यामुळे मोबाइलधारक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार संबंधित ग्राहक तक्रार केंद्राकडे केली जाते, पण त्याचा निपटारा होत नसल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहक वर्ग त्रस्त झाले आहे.
व्यवसायासाठी आर्थिक मदतीची गरज
जिवती : तालुक्याला रोजगार पुरवू शकणारा एकही मोठा उद्योग नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटुंबातील युवकांच्या हाताला काम नाही.
एटीएममध्ये नोटांचा तुटवडा
गोडपिपरी : शहरातील मुख्य मार्गावर एटीएम मशीन बसविण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक वेळा पैशाचा ठणठणाट दिसून येत आहे, तर कधी तांत्रिक अडचणीमुळे या एटीएम मशीन बंद असतात. त्यामुळे नागरिकांना रांगेत लागून पैसे काढावे लागत आहेत.
प्रवाशी वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता
जिवती :तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरू आहे. आंध्र प्रदेशाच्या सीमेवर तालुका असल्याने येथे आंध्र प्रदेशातील अनेक वाहने अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत. जिवती ते अदिलाबाद या मार्गावर महामंडळाच्या बसेस नसल्याने अवैध वाहतूकदारांचे फावत आहे.