रस्त्यावरील वृक्षांना रेडियम पट्ट्या लावाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:44 IST2021-02-23T04:44:14+5:302021-02-23T04:44:14+5:30

कोरपना : तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा व प्रमुख मार्ग समजल्या जाणाऱ्या कोरपना ते गडचांदूर रस्त्यावरील वृक्षावर रेडियम पट्ट्या लावण्यात याव्यात, ...

Roadside trees should be covered with radium strips | रस्त्यावरील वृक्षांना रेडियम पट्ट्या लावाव्यात

रस्त्यावरील वृक्षांना रेडियम पट्ट्या लावाव्यात

कोरपना : तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा व प्रमुख मार्ग समजल्या जाणाऱ्या कोरपना ते गडचांदूर रस्त्यावरील वृक्षावर रेडियम पट्ट्या लावण्यात याव्यात, अशी मागणी वाहतूकदारांकडून होत आहे. वृक्षावर रेडियम पट्टी लावल्यास रात्रीच्या अंधारात प्रवासासाठी सोयीचे होईल, त्यामुळे पट्ट्या लावण्यात याव्यात, अशी मागणी आहे. जिल्ह्यातील काही मुख्य रस्त्यांवरील झाडांवर अशाप्रकारे रेडियम पट्ट्या लावण्यात आल्या होत्या.

तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावा

चंद्रपूर : जिल्ह्यातील एकाही तालुक्याच्या सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका कुठून सुरू होतो याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडत आहे. या सीमांवर सीमा स्वागत फलक लावल्यास सीमाही सुशोभित दिसेल, तसेच या माध्यमातून शहराच्या अंतराची माहितीही मिळेल. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गडचांदूर-पांढरकवडा बससेवा सुरू करा

गडचांदूर : येथून कोरपना, आदिलाबादमार्गे पांढरकवडा शहरासाठी थेट बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. गडचांदूर हे शहर सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथून अनेक भागांत जाण्यासाठी बससेवा आहे. मात्र, पांढरकवडासाठी थेट बससेवा नाही, तसेच आदिलाबाद हा कमी अंतराचा मार्ग असल्याने या मार्गावर बससेवा सुरू करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याकडे राज्य परिवहन महामंडळाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

माणिकगड पहाड ठरतोय ट्रेकर्ससाठी अद्भुत पर्वणी

जिवती : राजुरा, जिवती, कोरपना तालुक्यात असलेला माणिकगड पहाड हौशी ट्रेकर्ससाठी अद्भुत पर्वणी ठरत आहे. जिल्ह्यातील सात बहिणीच्या डोंगरासह याही पहाडाचा विकास साधल्यास पर्यटनदृष्ट्या येथील विकासाला चालना मिळेल, तसेच ट्रेकर्सनासुद्धा अन्य ठिकाणी जाऊन ट्रेकिंग करण्याची गरज पडणार नाही.

पडोली भाजीबाजारात कचऱ्याचा ढीग

चंद्रपूर : पडोली येथील बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाजारात खेरदी करण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात. सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे नागरिकांची भीती अधिकच वाढली आहे.

भद्रावती, राजुरा येथे संग्रहालय उभारा

राजुरा : जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावतीनगरी व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे. या भागातील ऐतिहासिक पाऊलखुणा जतन होतील. या माध्यमातून भावी पिढीला इतिहास समजण्यास सोपे होईल. पुरातत्व विभागाने लक्ष देऊन संग्रहालय उभारावे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

पोलीस ठाण्यांमध्ये कचऱ्यासारखी वाहने

चंद्रपूर : येथील शहर व रामनगर पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी वाहने जप्त करून आणण्यात आली आहेत. मात्र, वाहनमालकांनी ही वाहने अनेक वर्षांपासून नेलीच नाहीत. आता ती पोलीस ठाण्यात पडून आहेत. त्यातील अनेक वाहने भंगार झाली असून, काहींचे सुटे भागही बेपत्ता झाले आहेत. या वाहनांचा लिलाव केल्यास शासनाच्या महसुलात भर पडणार आहे. दरवर्षी न्यायालयाच्या आदेशाने या वाहनांचा लिलाव करण्यात येत असतो. मात्र, यंदा अद्यापही लिलाव करण्यात आलेला नाही. आता वाहने ठेवायची अडचण होत आहे.

शिवभोजनासाठी लागतात रांगा

चंद्रपूर : शासनाने शिवभोजन केंद्र सुरू केले आहे. मात्र, त्याच्यातील थाळींची संख्या मोजकीच ठेवली आहे. लाभार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागत असल्याने संख्या वाढविणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे बाहेरील गावाहूनही नागरिक येतात. त्यांचीसुद्धा शिवभोजनासाठी रांग असते.

सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी

नागभीड : काही गावांमध्ये असलेल्या हातपंपावर सौजऊर्जा पंप बसवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हातपंपावर सौरऊर्जा बसविल्यास नागरिकांच्या सोयीचे होणार आहे.

तुळशी-जेवरा रस्त्याची निर्मिती करा

कोरपना : तालुक्यातील जेवरा ते तुळशी हा पैनगंगा नदीलगतच्या दोन्ही गावांना प्रमुख जोडणारा मार्ग आहे. मात्र, अद्यापही हा मार्ग पक्का झाला नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची निर्मिती झाल्यास गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

टंचाईग्रस्त गावांचे सर्वेक्षण करावे

जिवती : तालुक्यातील काही गावांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाई असते. त्यामुळे या गावांचे आताच सर्वेक्षण करावे, यामुळे उन्हाळ्यामध्ये नियोजन करणे सोयीचे होईल, संबंधित विभागाने आराखडा तयार करण्याची मागणी केली जात आहे.

स्वच्छता अभियानात हवी गतिमानता

वरोरा : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे. मात्र, त्यामध्ये गती नसल्याने लोकसहभाग दिसून येत नाही. नाल्या, रस्ते व सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाने जनजागृती करून अभियान अधिक प्रभावीपणे राबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोळशाच्या धुळीने पिकांचे नुकसान

सास्ती : वेकोलि कोळसा खाण परिसरातून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे परिसरात कोळशाची धूळ उडते. यामुळे या भागातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कापूस पूर्णत: काळा पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यावर आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जेनरिक औषधसाठा वाढविण्याची मागणी

कोरपना : पंतप्रधान जनआरोग्य औषधी केंद्रामध्ये शासनाच्या सवलतीत औषधसाठा वितरित करण्यात येतो. मात्र, काही केंद्रांत अत्यल्प प्रकारचा औषधसाठा उपलब्ध आहे. परिणामी अतिरिक्त पैसे देऊन रुग्णांना औषधांची खरेदी करावी लागत आहे. औषधसाठा वाढविण्याची मागणी आहे.

झुडपी जंगलांमुळे जंगली जनावरांचा वावर

राजुरा : वेकोलिच्या कोळसा खाण परिसरात मातीच्या ढिगाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात झुडपी झाडे वाढली आहेत. येथे मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांचा वावर असून, शेतात हैदोस घातला आहे. परिसरातील सास्ती, गोवरी, साखरी, पोवनी, चार्ली, कढोली, मानोली, बाबापूर येथील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान करीत आहे.

स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना त्रास

जिवती : तालुक्यातील ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या गावात स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी केली जात आहे. पावसाळ्यामध्ये मृतदेह उघड्यावर जाळण्याची वेळ गावकऱ्यांवर येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी द्यावा

ब्रह्मपुरी : राज्य शासनाने शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली; परंतु अनेक शेतकऱ्यांची अद्यापही कर्जमाफी झाली नाही, तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात अडकले असून, कर्जमाफी देण्याची मागणी केली जात आहे. यातच कपाशीवर बोंडअळी, लाल्या, मावा, तुडतुडा आदी रोगांनी कहर केला आहे. अन्य पीकही रोगांनी ग्रासले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी तूट यंदा जाणवणार आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

आठवडी बाजार सुविधांचा अभाव

चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आठवडी बाजार भरतो. या बाजाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असली तरी बहुतांश बाजारांमध्ये सोयीसुविधा नसल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. कोरोना काळात बाजार बंद होता. आता सुरू झाला आहे.

पथदिवे सुरू करण्याची मागणी

चंद्रपूर : शहरातील काही वॉर्डांतील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. अंधारामुळे रात्री बाहेर निघणे कठीण होते. मनपाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालावी

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून, प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

शिधापत्रिका नसल्याने नागरिकांना त्रास

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांतील ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे आजही स्वस्त धान्य दुकानांतून धान्य खरेदीसाठी आवश्यक असलेल्या शिधापत्रिकापासून वंचित आहेत. परिणामी अतिरिक्त दरात धान्य खरेदी करावे लागत आहे. कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे या कुटुंबांनाही शिधापत्रिका देऊन धान्याचा लाभ द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

मोकाट जनावरांमुळे पिकांची नासाडी

पळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील कवडजई व येनबोडी शिवारात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. विविध रोगांच्या प्रादुर्भावापासून शेतकरी कसेबसे आपल्या पिकांचे संरक्षण करीत आहेत. मात्र, मोकाट जनावरांमुळे पिके नष्ट होत आहेत.

भरधाव धावणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष

वरोरा : शहरातील अनेक मार्गांवर वाहतूकदार भरधाव वेगाने वाहने चालवितात. मात्र, या वाहतूकदारांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे शहरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत पालकांनीसुद्धा आपल्या पाल्याला मार्गदर्शन करावे व वाहने हळू चालविण्याचा सल्ला द्यावा व समज द्यावी, अशी प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा

कोरपना : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र, अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रकल्पग्रस्तांना नोकरीची प्रतीक्षा

चंद्रपूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस प्रकल्पग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत त्यांना नोकरी देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. विविध कंपन्यांनी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, वेकोलि, सिमेंट कंपन्या, तसेच वीज मंडळामध्येही मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतीक्षेत आहे.

Web Title: Roadside trees should be covered with radium strips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.