३५० रुपयांसाठी सावलीतील पथदिवे पाच दिवस बंद
By Admin | Updated: July 14, 2016 00:57 IST2016-07-14T00:57:33+5:302016-07-14T00:57:33+5:30
नव्याने निर्माण झालेल्या सावली नगरपंचायतीचे पथदिवे अवघ्या ३५० रुपयासाठी पाच दिवस बंद ठेवल्याचा अफलातून प्रकार घडला.

३५० रुपयांसाठी सावलीतील पथदिवे पाच दिवस बंद
सावली : नव्याने निर्माण झालेल्या सावली नगरपंचायतीचे पथदिवे अवघ्या ३५० रुपयासाठी पाच दिवस बंद ठेवल्याचा अफलातून प्रकार घडला. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाविरूद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सावली तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असताना गेल्या पाच दिवसापर्यंत पथदिवे बंद होते. पथदिवे बंद असल्याचे कारण विद्युत जनित्राजवळील ग्रीप तुटल्याची सबब पुढे करण्यात आली. त्या ग्रीपची किंमत केवळ ३५० ते ४०० रुपये होती. मात्र नगरपंचायत प्रशासनाकडे ५०० रुपये सुद्धा तात्काळ खर्च करण्याचा अधिकार नसल्याने मुख्याधिकाऱ्याच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागली. मुख्याधिकारी आठवड्यातून एकदाच येत असल्यामुळे सावली येथील नागरिकांना भर पावसात अंधारात ये-जा करावी लागली.
सावली नगर पंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्यात व्यक्तीगत बनाव असल्याची शक्यता असल्यामुळे पदाधिकाऱ्यांना ५०० रुपयापर्यंतही खर्च करता येऊ नये, याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महावितरण विभागाची तांत्रिक अडचण असती तर एकदाचे मान्य करता आले असते. परंतु, केवळ ३५० रुपयासाठी सावली नगराचे पथदिवे बंद ठेवणे याला काय म्हणावे, अशी चर्चा सावली नगरात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)