ंचिंचाळा येथील स्मशानभूमी रस्त्याचे काम निकृष्ट
By Admin | Updated: April 19, 2015 01:05 IST2015-04-19T01:05:35+5:302015-04-19T01:05:35+5:30
येथून जवळच असलेल्या चिंचाळा येथील चिंचाळा-फिस्कुटी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागअंतर्गत केले जात आहे.

ंचिंचाळा येथील स्मशानभूमी रस्त्याचे काम निकृष्ट
भेजगाव : येथून जवळच असलेल्या चिंचाळा येथील चिंचाळा-फिस्कुटी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागअंतर्गत केले जात आहे. मात्र कंत्राटदाराकडून सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंंत्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे.
सदर रस्ता दळणवळणाचा असून स्मशानभूमीकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. कंत्राटदाराने मनमानी करीत निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याने या रस्त्याचा अल्पावधीतच बोजवारा उडण्याची शक्यता नागरिकांनी तक्रारीतून व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी शाखा अभियंता धोडरे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता, काम चांगलेच असल्याच सांगून त्यांनी उद्धटपणे उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
सदर काम सुरू असतानाच अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे संपूर्ण रस्ता उखडला आहे. कंत्राटदाराचा शाखा अभियंत्यांशी आर्थिक व्यवहार झाल्यानेच सदर काम निकृष्ट होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कामाच्या ठिकाणी ग्रामस्थांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, बांधकाम विभागाचा कुणीही अधिकारी ढुंकून पाहत नाही. लाखो रुपये खर्च करूनसुद्धा काम निकृष्ठ होत असल्याने व तालुक्याच्या ठिकाणाहून तक्रारीची दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. सदर कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन चौकशी करावी व कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)