सांडव्यातील रस्ता वाहून गेला
By Admin | Updated: July 18, 2016 01:52 IST2016-07-18T01:52:13+5:302016-07-18T01:52:13+5:30
सिंचन शाखा रोजोली, उपविभाग मुल अंतर्गत येत असलेला चिखली येथील भसबोरण तलाव पुर्णपणे भरलेला आहे.

सांडव्यातील रस्ता वाहून गेला
सिंचन विभागाचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यास अडचण
चिखली : सिंचन शाखा रोजोली, उपविभाग मुल अंतर्गत येत असलेला चिखली येथील भसबोरण तलाव पुर्णपणे भरलेला आहे. या तलावाची पाणी साठविण्याची क्षमता २.९०५ द.ल.घ.मी. आहे. चिखली ते कन्हाळगाव हा मार्ग भसबोरण तलावाच्या सांडव्यातून जात असून मागील आठवड्यातील संततधार पावसामुळे सांडव्यातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे.
चिखली येथील भसबोरण तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे तलावातील अतिरीक्त पाणी सांडव्याच्यामार्फत जात असून याच सांडव्यात चिखलीवरून कन्हाळगावला जाणारा एकच मुख्य रस्ता आहे. सांडव्यात बांधण्यात आलेली दगडांची पिचींग ही मागील वर्षीच पुर्णपणे वाहुन गेल्यामुळे तिथे एकही दगड शिल्लक नसून मोठमोठे खड्डे पडले आहेत.
जनावरांना चराईसाठी कन्हाळगाव येथील जंगल हे एकमेव ठिकाण असल्यामुुळे गुराखी जनावरांना याच रस्त्याने जनावरांना नेत असतात. रस्त्यातील खडयात पडून अनेक जनावरे जखमी होत असून पाण्याचा ओव्हरफ्लो जास्त वाढल्यावर बकऱ्या, गायी व म्हशी वाहून जाण्याचा धोका असतो. शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कन्हाळगाव येथे हनुमानाचे जागृत मंदीर आहे. मंदीराकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून रस्ता बंद असल्यामुळे आपली वाहने अर्ध्या रस्त्यात ठेवून त्यांना तीन ते चार किलोमीटर पायी जावे लागत आहे. कन्हाळगाव परीक्षेत्रात चिखली येथील शेतकऱ्यांच्या जमिनी असुन आता रोवणीचे काम सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांना शेतात ट्रक्टर घेऊन जाणे अवघड झाले असल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. पावसाळा अजून शिल्लक आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास याठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्यामुळे सिंचाई विभागाच्या निष्काळाजीपणाविरूद्ध नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहेत. पावसाळा लागण्यापूर्वीच सिंचाई विभागाने याकडे लक्ष देऊन सिमेंट रस्ता व रस्त्याच्या काठावरील दगडाची पिचींग दुरुस्त करून घेतली असती तर आज रस्ता वाहून जाण्याची वेळ आली नसती.
गावातील सरपंच प्रेमिला कडस्कर यांनी याबाबतचे निवेदन सिंचाई विभागाला दिले आहे. सिंचाई विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता दुरूस्त करून रस्ता पुर्ववत चालु करावा व शेतकऱ्यांना, जनावरांचा तसेच भाविकांना होणारा नाहक त्रास कमी करावा, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने राजोलीचे शाखा अभियंता पारखी यांच्याशी संपर्क साधला असता येत्या दोन ते तीन दिवसात रस्ता पूर्ववत सुरू होईल, असे सांगितले. (वार्ताहर)