सुबईतील रस्त्याचे रुपांतर झाले नालीत
By Admin | Updated: October 11, 2015 02:14 IST2015-10-11T02:14:48+5:302015-10-11T02:14:48+5:30
राजुरा तालुक्यातील सुबई गावातील वॉर्ड क्रमांक तीनमधील नालीत रुपांतर झालेल्या रस्त्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे.

सुबईतील रस्त्याचे रुपांतर झाले नालीत
रस्त्यावर अतिक्रमण : रस्त्या चालण्यासाठी की डासांच्या उत्पत्तीसाठी?
सुबई : राजुरा तालुक्यातील सुबई गावातील वॉर्ड क्रमांक तीनमधील नालीत रुपांतर झालेल्या रस्त्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. हा रस्ता सोमा राऊत, सुनिल व्यंकटी आत्राम यांच्या घरापासून प्रकाश आत्राम यांच्या घरापर्यंत सुमारे ५० मीटर लांबीचा आहे.
सदर रस्ता हा फार जुना असून त्या वॉर्डात आदिवासी बांधवांचे मोेठ्या संख्येने वास्तव्य आहे. परंतु त्या वॉर्डातील रहिवाशांना आज त्या रस्त्यावरुन चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदर रस्ता नऊ फुट रुंदीचा असल्याचे समजते. परंतु आज तो रस्ता दोन ते तीन फुट शिल्लक राहिला आहे.
त्या वॉर्डात भारतीय सैन्यातील अनिल आत्राम यांचे घर आहे. सध्या परिसरात तापाची साथ सुरू आहे. आणि त्यांच्या घरासमोर पाण्याचे तळे निर्माण झाले आहे. सैनिक भारताचे रक्षण करतो. परंतु इथे असलेल्या त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण कोण करणार? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
एका महिलेने बांधकामासाठी बांधकाम साहित्य टाकले. ते पाहून स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्यावरील बांधकाम साहित्य हटविण्यास सांगितले. परंतु प्रत्यक्षात ज्यांनी पक्के बांधकाम करुन रस्त्यावर अतिक्रमण केले, त्यांना मात्र काहीच सांगितले नसल्याचा आरोप त्या महिलेने सरपंचाकडे तक्रारीतून केला आहे. सदर प्रकरणात अतिक्रमण केलेले नागरिक व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्यात समेट झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणी महिलेने व स्थानिक रहिवाशांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. हा प्रश्न मार्गी न लागल्यास गावात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)