राजुरा विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांचे भाग्य उजळणार
By Admin | Updated: April 13, 2016 01:22 IST2016-04-13T01:22:57+5:302016-04-13T01:22:57+5:30
राजुरा विधानसभा क्षेत्रातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती. काही गावातील पोच रस्ते उखडल्याने

राजुरा विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांचे भाग्य उजळणार
नांदाफाटा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती. काही गावातील पोच रस्ते उखडल्याने दळणवळणासाठी नागरिकांना अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अॅड. संजय धोटे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दर्जेउन्नती सुधारण्यासाठी १५ कोटी १७ लाख ७३ हजार रूपयांचा निधी तालुक्यातील रस्त्यांसाठी मंजूर झाला आहे.
तसेच खनिज विकास निधी अंतर्गत ४ कोटी २८ लाख ७८ हजार निधी प्राप्त झाला आहे. यामुळे राजुरा- गोंडपिंपरी, जिवती- कोरपना तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य उजाळणार आहे. तसेच आदिवासी उपाय योजना अंतर्गत पिपर्डा- चिंचोली रस्ता कामाकरिता २५ लाख मंजूर करण्यात आले आहे. चारही तालुक्यातील चौफेर रस्त्याचे दुरुस्ती व मजबूतीकरणाच्या कामाला महत्त्व दिल्यामुळे धिडसी-निरली यासह राजुरा-कोरपनाशी जोडणाऱ्या गोवरी- कवटाळा या कोलामाईन्स क्षेत्रातील जड वाहतुकीमुळे खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे प्राध्यान्याने घेण्यात येत आहे.
कोरपना येथे एक कोटीचे आदिवासीसाठी सामाजिक सभागृह, ग्रामीण भागातील दलित वस्तीसाठी सुधार योजनेंतर्गत रस्ते व मोरीचे कामे घेण्यात आले आहे. तीर्थक्षेत्र विकास कामे अंतर्गत कुसळ येथे रस्ता रुंदीकरण, पकड्डीगुड्डम रस्त्याला जोडणारा पोचमार्ग मजबूतीकरण व कुसळ येतील दुलनशाबाबा दर्गा परिसरात भोजन मंडप व रंगमंच ओटा यासाठी १५ लाखांचा निधी, तालुकाच्या ठिकाणी मुस्लिम समाजासाठी ‘शाहीखाना’ करीता मंजुरी मिळाली आहे.
भाजपाचे नेते आबीद अली यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय धोटे, आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांना मुस्लीम समाजाच्या कब्रस्तान संरक्षणासाठी भिंती बांधण्याऐवजी जिवंत लोकांना सामाजिक सभागृह (शाहिखाना) अशाप्रकारची कामे करण्याकरिता विनंती केली होती. याला होकार देत जिल्ह्यात तालुक्यासह सहा ठिकाणी मुस्लीम शाहीखाने मंजूर करण्यात आले आहेत.
त्यामुळे मुस्लीम समाजाला हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. हा नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी ठरणारा असून जिल्ह्याच्या ठिकाणी मुस्लीम समाजाला शाहिखाना, मुस्लीम लायब्ररी मंजूर करावे, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक होकार दिला. यामुळे फक्त मुस्लिम समाजात आनंद पसरला आहे. (वार्ताहर)