पोंभुर्णा एमआयडीसीचा मार्ग झाला मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 05:00 IST2021-10-28T05:00:00+5:302021-10-28T05:00:24+5:30
आदिवासी तरुण, तरुणींनी उद्योजक म्हणून पुढे यावे, विशेष जागा आरक्षित करून प्राधान्य देण्याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच काही प्रमुख उद्योजकांची बैठक घेऊन या एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग उभारण्याकरिता विनंती करेन, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना नेमक्या अडचणी काय आहेत हे जाणून घेतले, भूसंपादन आणि शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भात चर्चा करताना स्थानिक शेतकऱ्यांवर आणि तरुणांवर अन्याय होऊ नये यासाठी विशेष सूचना त्यांनी दिल्या.

पोंभुर्णा एमआयडीसीचा मार्ग झाला मोकळा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या पोंभुर्णा येथील बहुप्रतीक्षित एमआयडीसी प्रकल्पाला गती मिळाली असून, येत्या वर्षभरात सुमारे १५० एकर क्षेत्रात एमआयडीसी रस्ते, वीज, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा पूर्ण करणार आहे. लोकलेखा समितीचे अध्यक्ष माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवन येथील त्यांच्या दालनात एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि पोंभुर्णा एमआयडीसीचा मार्ग मोकळा केला.
यावेळी आदिवासी तरुण, तरुणींनी उद्योजक म्हणून पुढे यावे, विशेष जागा आरक्षित करून प्राधान्य देण्याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच काही प्रमुख उद्योजकांची बैठक घेऊन या एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग उभारण्याकरिता विनंती करेन, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना नेमक्या अडचणी काय आहेत हे जाणून घेतले, भूसंपादन आणि शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भात चर्चा करताना स्थानिक शेतकऱ्यांवर आणि तरुणांवर अन्याय होऊ नये यासाठी विशेष सूचना त्यांनी दिल्या. पोंभुर्णा एमआयडीसीकरिता मौजे कोसंबी (रीठ) येथील १०२.५० हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून ५.४३ हेक्टरचे क्षेत्र शासकीय अधिग्रहित आहे. यापैकी ५१ हेक्टर क्षेत्रावर औद्योगिक वसाहतीचे काम तातडीने सुरू करता येईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना या बैठकीत दिली. या एमआयडीसीमुळे स्थानिक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल, उद्योजकांना संधी मिळेल आणि परिसराचा आर्थिक विकास साधला जाईल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
या बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अंनबालगण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील, सहसचिव (उद्योग) संजय देगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे आदींची उपस्थिती होती.