दोन दिवसात उखडला १५ लाखांचा रस्ता
By Admin | Updated: March 19, 2015 00:51 IST2015-03-19T00:51:03+5:302015-03-19T00:51:03+5:30
खनिज विकास निधी अंतर्गत नांदाफाटा ते पिंपळगाव मार्गावर यादव दूध डेअरीपर्यंत नुकतेच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.

दोन दिवसात उखडला १५ लाखांचा रस्ता
नांदाफाटा: खनिज विकास निधी अंतर्गत नांदाफाटा ते पिंपळगाव मार्गावर यादव दूध डेअरीपर्यंत नुकतेच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून अवघ्या दोन दिवसातच लाखो रुपयाचा रस्ता उखडला आहे.
मागील गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम रखडले होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी यासाठी निधी मंजूर करुन घेतला. परंतु जवळपास १५ लाख रुपयाचा हा मार्ग अतिशीय निकृष्ट दर्जाचा बांधण्यात आला आहे. या मार्गावरुन पुढे गडचांदूर- भोयगाव- चंद्रपूरकडे जाता येते. त्यामुळे नांदा- नांदाफाटा, बिबी, आवारपूर, राजुरगुडा, खिर्डी, इंजापूर, वडगाव आदी गावांमधील नागरिक या मार्गाने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. विशेष म्हणजे, चंद्रपूर येथे जाण्यासाठी सदर मार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा असून अंतर व वेळेत बचत होते. त्याचबरोबर रस्त्यालगत अल्ट्राटेक सिमेंट उद्योग असून अनेक कामगार, मजूर व शेतकरी या मार्गावरुन प्रवास करतात. पिंपळगाव मार्गालगत आता लोकवस्ती असून दिवसरात्र वर्दळ सुरू असते.या मार्गावर शाळा असल्याने विद्यार्थीसुद्धा मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. पावसाळ्यात श्रीवास्तव कॉलनीजवळ या मार्गावर प्रवास करताना नागरिकांना गुडघाभर खड्ड्यातून चिखल तुडवित जावे लागत होते. शेतकऱ्यांना शेतातून माल वाहून नेताना अडसर निर्माण झाली होती. या रस्त्याला निधी मंजूर झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी मोठा गाजावाजा केला तर कार्यकर्तेही याचे श्रेय आपसात लाटू लागले. मात्र प्रत्यक्षात हा मार्ग थातूर-मातूर बांधल्याने आता सारेच मुग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे. मार्गाची अशी दुरवस्था झाली असताना याकडे कुणी बघायला तयार नाही.
ज्या अधिकाऱ्यांना या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे ते अधिकारी आणि कंत्राटदार याकडे कानाडोळा करीत आहे. निकृष्ट काम तालुक्यात अनेक ठिकाणी सुरु आहे. केवळ डांबरीकरण करून कंत्राटदार मोकळे होत आहे. कामाची चौकशी करून कारवाईकरण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)
अनेक रस्त्यांची दुरवस्था
तालुक्यात आजही अनेक पोचमार्ग डांबरीकरणाविनाच आहे. काही मार्गावर गिट्टी टाकण्यात आली आहे. मात्र अद्यापही काम सुरु झाले नाही. यातच नांदाफाटा- पिंपळगाव मार्गाचे काम जिल्हा परिषदने सुरु केले. अवघ्या पाच ते सहा दिवसात रस्ता तयार झाला. केवळ चुरी टाकून डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पावसाने रस्ता पूर्णत: उखळला. रस्ता बांधकाम करतांना पाहिजे त्या प्रमाणात साहित्याचा वापर करण्यात आला नाही. अवघ्या पाच ते सहा दिवसात रस्ता तयार होवून खराब झाला असताना कुणीच बोलायला तयार नाही.संबंधित अधिकाऱ्यांचे हात ओले झाल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. तर दुसरीकडे नागरिक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करीत आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे कोरपना येथील अभियंता नितळे यांच्याशी संपर्क केला असता सदर रस्त्यांच्या बांधकामासाठी किती निधीची मंजुरी आहे हे सध्या सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सदर प्रतिनिधीने कामाचा निधी आणि रस्त्याच्या बांधकामाबाबत वारंवार विचारले असता तुम्ही कार्यालयात येऊन भेटा, असे उत्तर देण्यात आले. रस्त्याचे बांधकाम करताना आपण भेट दिली व येथील काही लोकप्रतिनिधीसमक्ष आपण काम केल्याचेही सांगितले.
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
या रस्त्याचे अत्यंत निकृष्ट बांधकाम झाले आहे. शासन रस्त्याच्या बांधकामासाठी लाखो रुपये खर्च करीत असताना संबंधित अधिकारी व कंत्राटदार मनमानी कारभार करीत. हेच चित्र नांदाफाटा पिंपळगाव रस्त्याचे बांधकाम होतांना बघायला मिळाले. या रस्त्याचे पूर्ण बांधकाम करावे व संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी संतोष बोबाटे, जनार्धन , किसन कडूकर, मनोहर झाडे, बंडू उरकुडे, राजेंद्र पावडे, जोगी, चंदू चटप, प्रशांत ताजने, मंगेश माहोरे, सचिन भोयर, मनोज जोगी, स्वप्नील राजुरकर आदींनी प्रशासनाकडे केली आहे.