शासकीय विश्रामगृहाचा रस्ता झाला तळीराम स्ट्रीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST2021-01-08T05:34:13+5:302021-01-08T05:34:13+5:30
प्रशासकीयदृष्ट्या वरोरा हे उपविभागीय दर्जाचे ठिकाण असून येथील शासकीय विश्रामगृह हे नागपूर-चंद्रपूर राज्य महामार्गालगत आहे. त्यामुळे उच्चपदस्थ ...

शासकीय विश्रामगृहाचा रस्ता झाला तळीराम स्ट्रीट
प्रशासकीयदृष्ट्या वरोरा हे उपविभागीय दर्जाचे ठिकाण असून येथील शासकीय विश्रामगृह हे नागपूर-चंद्रपूर राज्य महामार्गालगत आहे. त्यामुळे उच्चपदस्थ अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची सातत्याने वर्दळ असते .
राज्य महामार्गावरून विश्रामगृहाकडे जाताना दाट झाडी असल्यामुळे रस्ता निसर्गरम्य आहे. त्यामुळे रस्ता प्रत्येकाला आकर्षित करतो.
रोज सकाळी व्यायाम करणारे नागरिक या रस्त्याचा वापर करतात. दुपारी गर्द झाडीच्या सौंदर्यामुळे युवक-युवतींना आणि प्रेमीयुगुलांना हा रस्ता सेल्फीकरिता आकर्षित करतो. पण रात्र मात्र तळीरामांची असते. सकाळी त्याचे पुरावे दिसतात. अंधाराचा फायदा घेत शहरातील तळीराम रात्री उशिरापर्यंत आपला घसा ओला करण्याचा उद्योग या रस्त्यावर करीत असतात. अनेक जण अंधारात झुंडीने मोठ्या प्रमाणावर वाढदिवस साजरे करतात. त्यामुळे नागरिकांसाठी हा रस्ता पूर्णतः असुरक्षित झालेला आहे. येथे येणाऱ्या तळीरामांवर वचक बसवावा, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांची आहे. त्याकरिता शासकीय कार्यालयासोबत पत्रव्यवहार पण झालेला आहे. मात्र, सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.