अमृतसाठी खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST2021-04-10T04:27:38+5:302021-04-10T04:27:38+5:30

१. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम २. नगरसेवकांनी दिलेले आश्वासने हवेतच ३. जागोजागी गटार तुंबले ४. रेल्वे उड्डाण पुलाचे काम ...

The road dug for nectar shocks the citizens | अमृतसाठी खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना धक्के

अमृतसाठी खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना धक्के

१. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम

२. नगरसेवकांनी दिलेले आश्वासने हवेतच

३. जागोजागी गटार तुंबले

४. रेल्वे उड्डाण पुलाचे काम संथगतीने

चंद्रपूर : येथील १५ हजार लोकसंख्येचा प्रभाग असलेल्या हिंदुस्थान लालपेठ काॅलरी प्रभागामध्ये रस्ते, पाणी, नाल्यांचा प्रश्न उभा ठाकला आहे. सोबतच अमृत योजनेसाठी जागोजागी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एकूणच प्रभाग खड्ड्यात असल्याची स्थिती येथे बघायला मिळत आहे. या खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, पिण्याचे पाणी आणि सांडपाण्याची समस्या गंभीर आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, या समस्यांकडे येथील नगरसेवकांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

चंद्रपूर शहराचा बाबूपेठ हा परिसर अविभाज्य घटक आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे मतदान महापालिकेतील सत्ताकारणासाठी महत्त्वाचे मानले जाते. बाबूपेठ परिसरातील हिंदुस्थान लालपेठ काॅलरी प्रभाग क्रमांक १६ मध्ये तीन नगरसेवक असून, हा प्रभाग इंजिनीअर काॅलेज चौक, फुले चौक, रेल्वे उड्डाण पूल, लालपेठ असा विभागला आहे. या प्रभागाचे नेतृत्व पहिल्यांंदाच निवडून आलेले श्याम कनकम, कल्पना बगुलकर, ज्योती गेडाम हे भारतीय जनता पक्षाचे असलेले नगरसेवक करतात. चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे या नगरसेवकांना शहराचा विकास करणे सहज शक्य आहे. मात्र, अंतर्गत राजकारणामुळे काही नगरसेवकांच्या हिश्श्याला काहीच मिळत नसल्याची स्थिती आहे. हिच परिस्थिती या प्रभागामध्येही बघायला मिळत आहे.

या प्रभागामध्ये अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी प्रत्येक रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. पाइपलाइन टाकून बुजविण्यात आली आहे. मात्र, रस्त्याची झालेली दैनावस्था न बघवणारी आहे. बहुतांश रस्ते निमुळते आहे. त्यातच खोदकाम करण्यात आल्यामुळे प्रभागात जागोजागी खड्डे पडले आहे. विशेष म्हणजे, काही रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. मात्र, तेही फोडण्यात आले असून, ते पूर्ववत करण्यात आलेच नाही. परिणामी, नागरिकांना या रस्त्यावरून चालणे सध्या कठीण होऊन बसले आहे. मात्र, प्रभागातील नगरसेवक मूग गिळून बसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांना निवडून दिले. मात्र, त्यांचे दुर्लक्ष झाले असून, नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत.

विशेष म्हणजे, प्रभाग मोठा असल्याने समस्याही मोठ्या आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याची समस्या येथील नागरिकांना सतावत आहे. एक, दोन दिवसांआड महापालिकेद्वारे या प्रभागात पाणीपुरवठा केला जाताे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागते. काही ठिकाणी महापालिकेने ट्युबवेलच्या साहाय्याने ठिकठिकाणी टाक्या बसविल्या आहे. मात्र, त्याचा उपयोग काही विशिष्ट नागरिकांनाच होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रभागाच्या असलेल्या नगरसेवक कल्पना बगुलकर या झोन सभापती होत्या. मात्र, त्यांनीही समस्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.

बाॅक्स

सिमेंट रस्त्याचे तिनतेरा

येथील काही ठिकाणी सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, अमृतसाठी ते रस्ते फोडण्यात आल्याने त्या ठिकाणी आता केवळ खड्डे शिल्लक आहे. प्रगती बुद्धविहार परिसरातील रस्त्याची अशीच बिकट अवस्था आहे.

बाॅक्स

फोटो घ्यावा मोठा

सांडपाणी वाहते रस्त्यावर

येथील पॅरामाउंट काॅन्व्हेंट्समोरील रस्ता, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोरील परिसराची दुरवस्था झाली आहे. येथे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरामध्ये स्वच्छ चंद्रपूरचे तीनतेरा वाजले असून, या सर्वेक्षणामध्ये चंद्रपूरचा नंबर कसा येतो, हा प्रश्न असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

बाक्स

नॉर्मल स्कूल वार्डमध्ये १५ ते २० वर्षांपासून डब्ल्यूसीएलद्वारे पाइपलाइन टाकून पाण्याचा प्रश्न सोडविला होता. यामुळे नागरिकांना नियमित पाणी मिळत होते. मध्यंतरी महापालिकेने पाणीपुरवठ्याचे कंत्राट दिले. त्यामुळे कंत्राटदाराचे नुकसान टाळण्यासाठी डब्ल्यूसीएलद्वारे सोडण्यात येणारे पाणी बंद करून महापालिकेद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. विशेष म्हणजे, आता महापालिकेद्वारे पुन्हा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, तो अनियमित असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.

बाॅक्स

येथे अमृत योजनेची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. टाकीही बांधण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत ती योजना सुरू झाली नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी महापालिकेद्वारे सोडण्यात येणाऱ्या नळावर अवलंबून रहावे लागते. विशेष म्हणजे, दिवसाआड तर कधी दोन ते तीन दिवसांपर्यंत पाणीच येत नसल्यामुळे नागरिक ट्युबवेलवर लावलेल्या पाणी टाकीतून पाणी आणून ते वापरतात. मात्र, त्या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केला जात नसल्याने अशुद्ध पाणीच नागरिकांना प्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.

बाॅक्स

रेल्वे उड्डाणपुलामुळे नागरिकांत संताप

चंद्रपूर आणि बाबुपेठला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यासाठी नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन केले. त्यानंतर, मोठ्या परिश्रमाने येथील रेल्वे उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, बांधकामामध्ये संथगती असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तेवढा महत्त्वाचा नसलेल्या दाताळा नदीवरील पूल वेळेत पूर्ण होऊ शकतो. मात्र, बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलालाच वेळ का, असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत.

बाॅक्स

चौकाचे सौंदर्यीकरण नाही

येथे विविध चौक आहेत. मात्र, यातील बहुतांश चौकाचे कोणतेही सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. त्यातीलच एक असलेल्या दुर्गामाता मंदिर परिसरातील चौकाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, येथे केवळ एक बेंच लावून ठेवण्यात आला असून, नगरसेवकांनी आपले काम पूर्ण केले आहे.

कोट

परिसरात नाल्या आहेत. मात्र, त्यातील अनेक नाल्या खचल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी, डासांचे प्रमाणही वाढले असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायम आहे. सिमेंट रस्ते तोडण्यात आले. मात्र, त्या रस्त्यांना दुरुस्त करण्यात आले नाही. प्रभागातील समस्यांकडे नगरसेवकांचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.

- एकनाथ मेश्राम, नागरिक

कोट

प्रभागात अनेक समस्या आहे. यातील रस्त्याची समस्या मोठी आहे. जुनोना चौक, फुले चौक रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढेच नाही, तर अपघाताची शक्यता आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या जागोजागी चोकअप झाले आहे. त्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. प्रभागातील समस्या सोडविण्याकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष झाले आहे.

-चंदा वैरागडे

-कोट

इतर प्रभागाच्या तुलनेत हा प्रभाग मोठा आहे. त्यामुळे समस्याही अनेक आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची दुरवस्था झाली आहे. त्या नियमित साफ केल्या जात नाही. परिणामी, पाणी रस्त्यावर येत आहे. रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, त्याची डागडुजी करण्यात आली नाही. परिणामी, नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. या समस्यांकडे नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

-सीमा हांडे

नागरिक

Web Title: The road dug for nectar shocks the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.