नदी, नाले फुगले, गावात शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST2021-07-23T04:18:15+5:302021-07-23T04:18:15+5:30
चंद्रपूरसह जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची झळ सुरू आहे. गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वेग धरलेल्या पावसाने दुपारी १.३० ...

नदी, नाले फुगले, गावात शिरले पाणी
चंद्रपूरसह जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची झळ सुरू आहे. गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वेग धरलेल्या पावसाने दुपारी १.३० वाजपर्यंत अक्षरश: झोडपून काढले. पावसामुळे शहरातील सर्व वस्त्या जलमय झाल्या. रामनगर ते बिनगेट मार्गावरील दुकाने व अनेकांच्या घरात पाणी शिरले. शहरातील मुख्य वस्ती, तुकूम, बाबूपेठ, बंगाली कॅम्प या परिसरातही अशीच स्थिती होती. जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरही जलमय झाल्याचे दिसून आले.
अमृतच्या खड्ड्यांमुळे नाल्या चोकअप
मनपाने अमृत योजनेसाठी शहरातील अनेक वाॅर्डांमध्ये नाल्या खोदून ठेवल्या मात्र पाईप टाकले नाही. जिथे पाईप टाकले तिथे मातीने बुजविले नाही. बऱ्याच वाॅर्डांमध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालीतील गाळ उपसला नाही. पावसामुळे नाल्या जागोजागी चोकअप झाल्या. पाणी मिळेल त्या दिशेने वाहू लागल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप झाला.
चिमूर तालुक्यात सर्वाधिक ५६. ७ टक्के पाऊस
गत आठवडाभर दडी मारलेल्या पावसाने मंगळवारपासून वेग धरल्याने जिल्ह्यातील नाले व तलाव तुडुंब भरून ओसंडून लागले आहेत. चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी, मूल, सावली, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, राजुरा, जिवती, चिमूर व कोरपना तालुक्यातही बुधवारपाासून झळ सुरू आहे. पावसाची झळ पुन्हा तीन दिवस सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. २४ तासात चिमूर तालुक्यात सर्वाधिक ५६.७ टक्के तर गोंडपिपरी तालुक्यात सर्वात कमी १६.६ पावसाची नोंद झाली आहे.
लाल नाला प्रकल्पाचे सहा गेट उघडले
पावसामुळे लाल नाला प्रकल्पाचे सहा गेट उघडण्यात आले आहेत. गोसीखुर्द धरणातून सध्या १६० क्युमेक्स पाणी सोडले जात आहे. या परिसरातही पाऊस सुरू असल्याने आज दुपारी २ वाजतापासून जल विसर्गाची पातळी ५०० क्युमेक्सपर्यंत वाढविण्यात आली. नदीपात्राजवळील गावांनी काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या.
सर्व तालुक्यांत पावसाची झळ
सोयाबीन व कपाशीच्या पेरण्या आटोपल्या. सध्या पिकांची स्थिती बरी आहे. मात्र, जुलै महिन्यातील दोन आठवडे कोरडे गेल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली. पऱ्हे रोवणीच्या स्थिती असूनही पाऊस नव्हता. बुधवारपासून सर्वच तालुक्यात झड सुरू आहे. झडीच्या पावसाचे पाणी जमिनीत चांगले मुरते. त्यामुळे धान उत्पादक तालुक्यात रोवणीला वेग येण्याची शक्यता आहे.