नव्या कोळसा खाणीमुळे पुराचा धोका
By Admin | Updated: March 16, 2015 00:42 IST2015-03-16T00:42:44+5:302015-03-16T00:42:44+5:30
कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव) येथे नव्या कोळसा खाणीला मंजुरी देण्यात आली आहे. या खाणीचे कामही लवकरच सुरू होणार आहे.

नव्या कोळसा खाणीमुळे पुराचा धोका
जयंत जेनेकर कान्हाळगाव (कोरपना)
कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव) येथे नव्या कोळसा खाणीला मंजुरी देण्यात आली आहे. या खाणीचे कामही लवकरच सुरू होणार आहे. मात्र या नव्या कोळसा खाणीच्या उत्खननामुळे मातीचे ढिगारे तयार होतील. त्याचा फटका पैनगंगा नदीपात्रालगतच्या गावांना पुराच्या रूपाने बसू शकतो. यामुळे या परिसरातील नागरिक व शेतकरी चिंतेत सापडला आहे.
कोरपना तालुक्यातील गाडेगाव, विरूर, सांगोडा, अंतरगाव, वनोजा, इरई, पिपरी, कारवाई व सीमेपलीकडील वणी तालुक्यातील परमडोह, कळमना, चिखली या गावांना खाणीची झळ बसण्याची जास्त शक्यता आहे. आधीच वणी तालुक्यातील मुंगोली येथील कोळसा खाणीमुळे पैनगंगा नदीचे पात्र धोक्यात आल्याने पूर समस्या भविष्यात गंभीर होऊ शकते. खाणीद्वारे प्रदूषण निर्देशांकाचे पालन न झाल्यास याचा परिणाम शेतपिकांवर जाणवू शकतो.
सिमेंट उद्योगांच्या धुळीमुळे तालुक्यातील नागरिकांना अनेक आजार जडले जात आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. एकीकडे औद्योगिक विकासाचे स्वप्न पाहताना नैसर्गिक हाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे.
या अनुषंगाने प्रदूषण व कृत्रिम मातीचे ढिगारे यावर निर्देशकांप्रमाणे पालन करण्याची गरज असल्याची मागणी अंतरगावचे उपसरपंच आशिष मुसळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी केली आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी.
पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय व्हावे
नैसर्गिक पावसामुळे आधीच पुराचा धोका गंभीर आहे. आता मातीच्या कृत्रिम ढिगाऱ्यांमुळे ही समस्या अधिक प्रमाणात उदभवू शकते. पैनगंगा नदीच्या पाण्याचे पिण्यासाठी उपयोग होतो. नदी प्रदूषीत होऊ नये व पूर समस्येवर उपाय शोधून तसे नियोजन करावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.