शिवभोजनच्या प्लास्टिक पॅकिंगमुळे कॅन्सरचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST2021-07-22T04:18:26+5:302021-07-22T04:18:26+5:30
चंद्रपूर : गरीब तसेच गरजुंना ताजे आणि गरम भोजन मिळावे, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी राज्य शासनाने शिवभोजन ...

शिवभोजनच्या प्लास्टिक पॅकिंगमुळे कॅन्सरचा धोका
चंद्रपूर : गरीब तसेच गरजुंना ताजे आणि गरम भोजन मिळावे, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी राज्य शासनाने शिवभोजन योजना सुरू केली. मात्र, जिल्ह्यातील काही केंद्रातून अक्षरश: प्लास्टिकच्या पिशव्यांमधून जेवण पार्सल दिले जात असल्यामुळे लाभार्थ्यांना कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. प्लास्टिकमध्ये गरम अन्नपदार्थ टाकल्याने त्याचे विघटन होऊन ते अन्नपदार्थामध्ये मिसळतात. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. शासनाचा उद्देश चांगला असतानाही शिवभोजन संचालकांच्या पैसे वाचवण्याच्या शार्टकटमुळे गरीब लाभार्थ्यांच्या आरोग्यासोबत खेळले जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे.
जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र असून, ३ हजार ७०० थाळ्यांचे दररोज वितरण केले जाते. कोरोना नियमांमध्ये शिथिलता मिळाल्यामुळे शिवभोजन केंद्रात बसून जेवण करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश केंद्रातून पार्सलच दिले जात आहे. विशेषत: पावसाचे दिवस असतानाही सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. मात्र, याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. मोफत जेवण मिळत असल्यामुळे लाभार्थी मुकाट्याने पार्सल घेऊन जात आहेत. मात्र, या पार्सलद्वारे ते स्वत:लाच मृत्यूच्या दारात ढकलत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या केंद्राची तपासणी करून शिवभोजनचा दर्जा तसेच स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणे सध्यातरी गरजेचे आहे.
बाॅक्स
एकूण शिवभोजन केंद्र -२६
दररोज वितरित होणाऱ्या थाळी ३,७००
बाॅक्स
काय मिळतात?
दोन चपात्या
एक वाटी भात
एक वाटी भाजी
एक वाटी वरण
बाॅक्स
प्लास्टिकमुळे प्रदूषणात वाढ
राज्यात प्लास्टिक बंदी आहे. असे असतानाही काही शिवभोजन केंद्रातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांतून लाभार्थ्यांना पार्सल स्वरुपात जेवण दिले जात आहे. लाभार्थी जेवणानंतर वाट्टेल तिथे प्लास्टिक पिशव्या फेकत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.
बाॅक्स
बसून जेवणाऱ्यांसाठी नो एन्ट्री
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य शासनाने पार्सलद्वारे शिवभोजन थाळी देण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, आता कोरोना नियमात शिथिलता मिळाली आहे. तसेच शिवभोजन केंद्रात बसून जेवण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, बहुतांश केंद्रात लाभार्थ्यांना बसूच दिले जात नाही. त्यांना पार्सल देऊन बाहेर काढले जात आहे.
बाॅक्स
उद्देश चांगला, मात्र यंत्रणेचे दुर्लक्ष
शिवभोजन केंद्रातून गरिबांना जेवण मिळत असले तरी प्रशासकीय यंत्रणेद्वारे प्रभावी अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे शासनाचा उद्देश चांगला असतानाही गरजूंना त्याचा योग्य लाभ मिळत नसल्याची स्थिती आहे.
बाॅक्स
कोरोना नियमांची ऐसी तैसी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांचा जीव गेला. आता संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलले जात आहे. मात्र, बहुतांश शिवभोजन केंद्रांमध्ये कोरोना नियम पाळले जात नसल्याचे चित्र आहे. ना सोशल डिस्टन्स, ना मास्क अशी काहीशी अवस्था बघायला मिळत आहे.
बाॅक्स
अन्न औषध प्रशासनाचेही दुर्लक्ष
सध्या पावसाचे दिवस आहेत. अस्वच्छतेमुळे विविध आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक जण स्वच्छतेवर भर देतो. मात्र, जिल्ह्यातील काही शिवभोजन केंद्रांमध्ये अस्वच्छता असून, याच वातावरणात भोजन वितरित केले जात आहे. विशेषत: लाभार्थ्यांना दिले जाणाऱ्या अन्नाचा दर्जाही तपासला जात नसल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
कोट
शासन नियमानुसार शिवभोजन केंद्र चालकांना लाभार्थ्यांना भोजन द्यावे लागेल. कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. असा प्रकार ज्या केंद्रात होत असेल तिथे आपण स्वत: जाऊन चौकशी करू, तसेच संबंधित तहसीलदार, अन्य अधिकाऱ्यांना याबाबत सांगून अशा केंद्राची तपासणी करून कारवाई केली जाईल.
-शालिकराम भराडी
जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर