५६३८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
By Admin | Updated: February 2, 2017 00:28 IST2017-02-02T00:28:54+5:302017-02-02T00:28:54+5:30
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी३ फेब्रुवारी २०१७ रोजी निवडणूक होणार असून जिल्हयात २७ केंद्रावर मतदान होणार आहे.

५६३८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
जिल्ह्यात २७ मतदान केंद्र : शिक्षक मतदार संघ निवडणूक
चंद्रपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी३ फेब्रुवारी २०१७ रोजी निवडणूक होणार असून जिल्हयात २७ केंद्रावर मतदान होणार आहे. जिल्हयात एकूण पाच हजार ६३८ शिक्षक मतदार मतदानाचा अधिकार बजावतील. सदर निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने पूर्व तयारी पूर्ण केली आहे.
जिल्हयात २७ मतदान केंद्र असून त्यात माढेळी, वरोरा, शेगावं बु., चिमूर, शंकरपूर, नागभीड, ब्रम्हपूरी, गांगलवाडी, तळोधी बा. नवरगांव, चंदनखेडा, भद्रावती, सिंदेवाही, पाथरी, सावली, मूल, पोंभूर्णा, चंद्रपूर शहरात दोन तर चंद्रपूर ग्रामीणमध्ये एक, बल्लारपूर, राजुरा, कोठारी, गोंडपिपरी, कोरपना, गडचांदूर, जिवती या मतदान केंद्राचा समावेश आहे. सदर गावामध्ये मतदान केंद्र हे ग्रामपंचायत, शाळा, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय किंवा नगर परिषदेच्या कार्यालयात आहे. या मतदान केंद्रवर पाच हजार ६३८ शिक्षक मतदानाचा अधिकार बजावतील. या मतदारामध्य चार हजार ३१० पुरुष तर एक हजार ३२८ महिला मतदारांचा समावेश आहे.
सर्व मतदान केंद्रावर प्रक्रिया चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी ९९ अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या केंद्रवर शंभरपेक्षा कमी मतदार आहे. तेथे एक केंद्राध्यक्ष व दोन मतदान अधिकारी तर ज्या ठिकाणी शंभरपेक्षा अधिक मतदार आहे. अशा मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
सर्व केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. या निरीक्षकामध्ये केंद्र शासनाच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय पंधरा गट विकास अधिकाऱ्यांची क्षेत्रीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)