साडेतीन लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
By Admin | Updated: October 14, 2014 23:16 IST2014-10-14T23:16:00+5:302014-10-14T23:16:00+5:30
७१-चंद्रपूर विधानसभा निवडणुकीतील मतदानासाठी येथील प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नजर ठेवली जात असून पोलीस विभागालाही सतर्क राहण्याच्या

साडेतीन लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
चंद्रपूर : ७१-चंद्रपूर विधानसभा निवडणुकीतील मतदानासाठी येथील प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नजर ठेवली जात असून पोलीस विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर विधानसभा मतदार संघात एकूण ३३६ मतदान केंद्र आहेत. या संघातील पोलींग पार्टीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर , चंद्रपूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने व तहसीलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट व साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्यांसह आज मंगळवारी पोलींग पार्टी आपआपल्या मतदान केंद्रावर रवाना झाल्या. विधानसभेसाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन लोकशाही मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
चंद्रपूर विधानसभा मतदार केंद्रात एकूण तीन लाख ५८ हजार २७ मतदार आहेत. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात तसे संवेदनशिल केंद्र नसले तरी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व ३३६ मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी एक उपविभागीय पोलीस अधिकारी, पाच पोलीस निरीक्षक, ३७ पोलीस उपनिरीक्षक व ९११ कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, आज निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस विभागाने मतदान केंद्रांची पाहणी केली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काय खबरदारी घ्यायची याबाबतही उपस्थित कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. उद्या १५ आॅक्टोबरला सकाळी ७ वाजेपासून विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानाला प्रारंभ करण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)