धनदांडग्यानी फिरविली करमणूक कराकडे पाठ
By Admin | Updated: March 6, 2015 01:11 IST2015-03-06T01:11:42+5:302015-03-06T01:11:42+5:30
मनोरंजनाचे प्रभावी साधन म्हणून दूरचित्रवाहिन्यांना महत्व आहे. करमणूकीच्या माध्यमातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळत असते.

धनदांडग्यानी फिरविली करमणूक कराकडे पाठ
चंद्रपूर : मनोरंजनाचे प्रभावी साधन म्हणून दूरचित्रवाहिन्यांना महत्व आहे. करमणूकीच्या माध्यमातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळत असते. मात्र, केबल आॅपरेटच्या करबुडीत धोरणामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ४३२ केबल आॅपरेटरकडे तब्बल सव्वा कोटी रुपयांचा कर थकीत आहेत. यात चंद्रपूर शहरातील ६० पेक्षा जास्त धनदांडग्या आॅपरेटरचा समावेश आहे.
कर भरण्यासाठी केबल आॅपरेटरना जिल्हा करमणूक विभागाने नोटीस बजावले आहेत. मात्र, या नोटीसांना न जुमानता कर भरण्यास दिरंगाई केली जात आहे. राज्य शासनाकडून चालू वर्षात चंद्रपूर जिल्ह्याला ५ कोटी रुपयांचे करमणूक कर वसूल करण्याचे उद्दीष्ट दिले. यापैकी ३ कोटी ९६ लाख ९१ हजार रुपये वसूल करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुक्यात ४३२ केबल आॅपरेटर आहेत. या केबल आॅपरेटरकडे ९९ हजार १९४ ग्राहक आहेत. तर ३३ हजार ८१३ हे डीटीएच जोडणीचे ग्राहक आहेत. ग्राहकांकडून नियमीत शुल्क घेऊनही केबल आॅपरेटर मात्र करमणूक विभागाकडे कर भरण्यास दुर्लक्ष करीत आहेत. करमणूक विभागाचे अधिकारीही अनेकदा नोटीस बजावले आहे. मात्र, कर भरण्यास दुर्लक्ष होत असल्याने ३१ मार्चपूर्वी कर वसूल करण्याचे प्रयत्न करमणूक विभागाकडून सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी)