क्रांतीनगरीत संगीताच्या तालावर थिरकली तरुणाई
By Admin | Updated: February 4, 2016 01:01 IST2016-02-04T01:01:28+5:302016-02-04T01:01:28+5:30
संगीतामध्ये इतकी शक्ती आहे की संगीताचे सूर कानावर पडताच अनेक जण आपल्या मनात असलेले विचार त्यागून आपले कर्ण संगीताच्या मधून सुराकडे वळवितो.

क्रांतीनगरीत संगीताच्या तालावर थिरकली तरुणाई
चिमूर पत्रकार असोशिएशनचा उपक्रम : नृत्य स्पर्धेत २६ संघांचा सहभाग
खडसंगी : संगीतामध्ये इतकी शक्ती आहे की संगीताचे सूर कानावर पडताच अनेक जण आपल्या मनात असलेले विचार त्यागून आपले कर्ण संगीताच्या मधून सुराकडे वळवितो. त्यातून आनंद घेत आपले भान हरपतो. त्यात मग संगीताच्या तालावर ठेका घेण्यासाठी एखाद्या कलावंताला संधी उपलब्ध झाली तर तो कसा थांबणार, याच संधीचे सोने करीत चिमूर क्रांती नगरीतील प्राथमिक ते महाविद्यालयीन तरुणाई संगीताच्या तालावर ठेका धरीत थिरकली.
सामाजिक बांधिलकी म्हणून चिमूर तालुका पत्रकार असोशिएशनद्वारे शनिवार अभ्यंकर मैदानावर शालेय समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते करण्यात आले. तर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.चंदनसिंह रोटेले होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा शिल्पा राचलवार, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, प्राचार्य एन.एस. कोकोडे, पोलीस निरीक्षक संतोष ताले, नगर परिषदेच्या सभापती छाया कंचर्लावार, जयश्री निवठे, उमेश हिंगे, डॉ.माधुरी कोकोडे, क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष बयानी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान, याच क्रांती भूमीत जन्मास येऊन उच्च पदावर कार्यरत असलेले नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस. कोकोडे तर जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून वर्धा येथे कार्यरत असलेले प्रकाश डायरे यांचा पत्रकार असोशिएशनतर्फे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य कोकोडे व प्रकाश डायरे यांनी आपल्या परिस्थितीसह केलेले कष्ट विशद करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य चंदनसिंह रोटेले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून पत्रकार असोशिएशनने राबविलेला हा उपक्रम अभिनंदनीय असून आणखी काही स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्याची विनंती पत्रकारांना केली.
प्राथमिक ते महाविद्यालयीन समुह नृत्य स्पर्धेत क्रांती नगरीतील २७ संघांनी सहभाग घेतला. चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये प्राथमिक गटात सहा, माध्यमिक गटात पाच, उच्च माध्यमिक गटात सहा तर महाविद्यालयीन गटात नऊ संघांनी सहभाग घेत आपली नृत्यकला सादर केली.
प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक राष्ट्रीय प्राथमिक शाळा चिमूरने पटकाविला तर द्वितीय संस्कार विद्यानिकेतन कॉन्व्हेंट चिमूर, तिसरा पुरस्कार बागला कॉन्व्हेंट चिमूर यांनी पटकाविला. माध्यमिक गटातून प्रथम येण्याचा मान मुकबधीर विद्यालय चिमूर, द्वितीय बागला कॉन्व्हेंट चिमूर तर तिसरा अनु.जाती मुलींची निवासी शाळा चिमूर यांनी मिळविला. उच्च माध्यमिक वर्ग आठ ते दहा गटात प्रथम पुरस्कार सेंट कॅलरेट कॉन्व्हेंट चिमूर यांनी पटकाविला, दुसरा पुरस्कार न्यू. राष्ट्रीय विद्यालय चिमूर तर तृतिय क्रमांक नेहरू विद्यालय चिमूर ने पटकाविला. महाविद्यालयीन गटातून प्रथम क्रमांक ग्रामगीता महाविद्यालय चिमूर यांनी पटकाविला, दुसरा क्रमांक आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर तर तिसरा पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर यांनी पटकाविला.
समुह नृत्य स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या संघास रोख रक्कम, सन्मान चिन्ह तथा प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मनोज मडावी संचालित जय गोंडवाना गृपने गोंडी ढेमसा नृत्य सादर केले. विजेत्या संघाना नगर परिषदेचे उपाध्यक्ष तुषार शिंदे, सभापती छाया कंचर्लावार, सभापती तुषार काळे, सतीश जाधव, पत्रकार असोशिएशनचे अध्यक्ष प्रा.चुन्नीलाल कुडवे, सचिव कलीम शेख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. (वार्ताहर)