उमेदवारांत निकालाची धडधड वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 00:43 IST2017-02-22T00:43:55+5:302017-02-22T00:43:55+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीने १६ फेब्रुवारीला शांततेत पार पडल्या.

उमेदवारांत निकालाची धडधड वाढली
निकालावर लाखो रुपयांची पैज : तारीख जवळ आल्याने उमेदवार अस्वस्थ
चंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीने १६ फेब्रुवारीला शांततेत पार पडल्या. कुठे मतदानाचा टक्का वाढला तर कुठे घटला. कुणाला किती मतदान झाले, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार असून त्यातूनच उमेदवाराच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे. गुरूवारी सकाळपासून मतमोजणी होणार असून जसजशी निकालाची तारीख जवळ येऊ लागली आहे, तस-तशी उमेदवारांची अवस्था टिकटिक वाजते डोक्यात... धडधड वाढते ठोक्यात..! काहीशी अशी झाली आहे.
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सर्वत्र शांततेत पार पडल्या. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून काही नवख्याचे राजकीय अस्तित्व सिद्ध होणार आहे. निवडणूक काळात प्रचारामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. यात सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या होत्या. प्रत्येक उमेदवारांना मतदार राजाचे मन जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यासाठी आश्वासनाची बरसात करावी लागली होती. त्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार बनली होती. (स्थानिक प्रतिनिधी)
हेवीवेट लढतीकडे लक्ष
पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा-घोसरी या जिल्हा परिषद क्षेत्राच्या लढतीकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. या क्षेत्रात काँग्रेसचे विनोद अहीरकर तर भाजपकडून विद्यमान जि. प. बांधकाम सभापती देवराव भोंगळे, संभाजी ब्रिगेडचे प्रा. दिलीप चौधरी हे रिंगणात होते. यात काँग्रेस व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी या क्षेत्राच्या लढतीसाठी सर्वस्व पणाला लावल्याने कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागून आहे. तसेच चिमूर तालुक्यातील शंकरपूर डोमा क्षेत्रात काँग्रेसचे माजी जि. प. अध्यक्ष डॉ. सतिश वारजुकर व भाजपाचे मनोहर रुदंये यांच्यात लढत झाली. ही लढतही काँग्रेस व भाजप पक्षाने प्रतिष्ठेची केल्याने आता निकालाची प्रतीक्षा आहे.
चिमुरात १५ टेबलवर होणार मतमोजणी
प्रतीक्षा असलेल्या जि. प. व पं. स. गणाची मतमोजणी सकाळी १० वाजता चिमूर तहसील कार्यालयातील राजीव गांधी सभागृहात होणार आहे. पाच गटासाठी १५ टेबलवर मतमोजणी करण्यात येणार असून एका टेबलवर पोस्टल मतदानाची मोजणी होणार आहे. २१ फेरी मध्ये मतमोजणी पूर्ण होणार असून भिसी- आंबोली गटापासून क्रमांकानुसार मतमोजणी केली जाणार आहे. स्ट्रागरुम सकाळी ९ वाजता उघडण्यात येणार असून उमेदवारानी ८.४५ वाजता यावे. मासळ रोड ते सातनाल्यापर्यंत वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात येणार आहे. मतमोजनीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार असल्याचे चिमूरचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मीक यांनी सांगितले.
हृदयाचे ठोके वाढू लागले
१६ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकांचा निकाल २३ फेब्रुवारीला लागणार आहे. त्यामुळे जशी निकालाची तारीख जवळ येवू लागली आहे, तसे रिंगणातल्या उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत.
उत्सुकता वाढली
निकालासाठी गुरुवारचा दिवस कधी उजाडतो, याची उमेदवार व कार्यकर्ते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. याची तयारी काहींनी आतापासूनच सुरु केली आहे. आपणच निवडून येणार, हा विश्वास काही उमेदवार दाखवत आहेत.
लाखो रुपयांची पैज
मतदानानंतर तब्बल एक आठवड्यानंतर उमेदवारांच्या भाग्याचा निकाल लागणार आहे. यामध्ये बराच वेळ मिळाल्याने ग्रामीण भागातील शौकीनांनी कोण निवडून येणार, किती फरकाने कोण विजय संपादन करणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, यावर अनेकजण लाखो रुपयांच्या पैजा लावल्या आहेत.