निकाल बारावीचा, आयुष्याचा नाही
By Admin | Updated: June 2, 2017 00:36 IST2017-06-02T00:36:52+5:302017-06-02T00:36:52+5:30
मंगळवारी बारावीचा निकाल जाहिर झाला. हा निकाल तसा बारावीचा होता, आयुष्याचा नव्हता.

निकाल बारावीचा, आयुष्याचा नाही
हे आहेत आयुष्याचे शिल्पकार : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून घडविला इतिहास
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: मंगळवारी बारावीचा निकाल जाहिर झाला. हा निकाल तसा बारावीचा होता, आयुष्याचा नव्हता. पण, मनासारखे यश न मिळाल्याने अंतर्बाह्य खचलेल्या वणीच्या कोमल चचाणे गळफास घेतला. औरंगाबादच्या मनीषा गायकवाड हीने स्वत:ला रेल्वे समोर झोकून दिले, नवी मुंबईतील पृथ्वी व्हावळ याने गळ्यात फास अडकवला. केवळ विद्यार्थीच नाही तर एका ढिकाणी पालकाने मुलाला अपेक्षीत गुण मिळाले नाहीत म्हणून स्वत:लाच संपवून टाकले. किती टोकाचे नैराश्य? किती अशक्त झालीत आमची मने ? परीक्षेतील अपयश हे आयुष्याच्या अंताचे कारण होवू शकते का? पण, पालकांच्या तथाकथित प्रतिष्ठेसाठी निर्माण झालेले प्रचंड अपेक्षांचे ओझे मुलांना पेलवत नाही. आणि ते अशा आत्मघाताकडे वळतात. प्रतिकुलतेचे असे प्रसंग राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी अशा सर्वांनीच पाहिले. परंतु ध्येयप्रती प्रामाणिक निष्ठा आणि स्वत:वरचा आत्मविश्वास या बळावर यांनी खेचून आणला यशाचा मंगलकलश. सारांश... कुठलेही अपयश म्हणजे आयुष्याचा अंत नसतो. हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी लोकमतने पुढाकार घेतला असून आज आयकॉन ठरलेल्यांनीच अपयशातूनच कसा यशाचा मार्ग शोधला त्यांचीच ही काही प्रेरणादायी उदाहरणे....
समर्पण महत्त्वाचे
परीक्षेत अपयश आले यात घाबरण्यासारखे, निराश होण्यासारखे विशेष काही नाही. आयुष्यात परीक्षा एकदाच होत नाही. एक-दोन परीक्षेमध्ये अपयश आले तरी काही बिघडत नाही. आपण परीक्षेची तयारी करताना किती समर्पित होतो, हे महत्वाचे आहे. शाळा-महाविद्यालयात विशेष यश न मिळालेले आज मोठ्या पदावर आहेत. फेसबुकचे मालक आहेत. चांगले मार्कस मिळविणारे अनेक विद्यार्थी पुढे काही करू शकले नाही, असेही अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिकाटी, समर्पण भावनेतून परीश्रम करीत रहावे. यश नक्कीच येईल.
-आशुतोष सलिल, जिल्हाधिकारी, चंद्रपूर.