सराफा बंदचा लग्नसराईवर परिणाम
By Admin | Updated: April 7, 2016 00:38 IST2016-04-07T00:38:36+5:302016-04-07T00:38:36+5:30
उत्पादन शुल्कात वाढ करण्याच्या विरोधात सराफा व्यावसायिकांनी बेमुदत बंद पुकारला आहे.

सराफा बंदचा लग्नसराईवर परिणाम
कोट्यवधींची उलाढाल ठप्प : दागदागिन्यांविनाच लग्न उरकण्याची पाळी
चंद्रपूर : उत्पादन शुल्कात वाढ करण्याच्या विरोधात सराफा व्यावसायिकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदमुळे जिल्ह्यात दररोज कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. आता याचा थेट फटका लग्नसराईलाही बसत आहे. दागदागिन्याविनाच लग्न उरकण्याची पाळी अनेकांवर आली आहे. याशिवाय नागरिकांच्या आर्थिक जुळवाजुळवीवरही सराफा बंदचा परिणाम होत आहे.
शासनाने सोनेचांदी व्यवहारातील उत्पादन शुल्कात १ टक्का वाढ केली आहे. याचा परिणाम सोनेचांदी खरेदीवर होऊन ग्राहकांनाही झळ बसणार आहे. त्यामुळे हे शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी देशभरात सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही २ मार्चपासून हा बंद पाळण्यात आला आहे. शहरातील अगदी गल्लीबोळातील सराफा दुकान २ मार्चपासून बंद आहे. उल्लेखनीय बाब अशी की जिल्ह्यातील विशेषत: जिवती, कोरपनासारख्या मागास भागातील लहानसहान सोनेचांदीच्या दुकानांनीही हा बंद गांभीर्याने पाळला आहे. जिल्ह्यात कोणतेही सराफा दुकान सुरू नाही.
सराफा दुकानांमधून दररोज जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल होते. तब्बल एक महिन्यांपासून ही उलाढाल ठप्प आहे. यात सराफा व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
आता एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा लोटत आहे. लग्नसराईची धामधूम सुरू झाली आहे. लग्नात सोनेचांदीच्या दागदागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. अनेकवेळा वरमंडळीचा दागिन्यांसाठी हट्ट असतो. तो वधुपिते पुरविताना दिसून येतात. मात्र आता सराफा दुकानेच बंद असल्याने वधू व वरांकडील मंडळींची मोठी गैरसोय होत आहे. संपूर्ण देशभरातीलच दुकाने बंद असल्याने दागिने कुठून करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वधुचा श्रृंगार दागिन्यानेच पूर्ण होतो, असे म्हटले जाते. मात्र दागिने घेताच येत नसल्याने मोठी तारांबळ उडत आहे. अनेक नववधुंना कुटुंबातील वडीलधाऱ्या महिलांचे दागिने घालून बोहल्यावर चढविले जात आहे. लग्नसमारंभातील महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मंगळसुत्र. तेसुध्दा करून द्यायला सुवर्णकार उपलब्ध नसल्याने बेन्टेक्ससारख्या धातूचे मंगळसुत्र खरेदी करून लग्नसमारंभ पार पाडावा लागत आहे. या सर्व प्रकारामुळे अनेकांची धावपळ होत आहे. (शहर प्रतिनिधी)
मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच
चंद्रपूर जिल्ह्यातील सराफा व्यापाऱ्यांनी २ मार्चपासून बंद पुकारला आहे. दरम्यान असोसिएशनचे पदाधिकारी व शासन यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. यात संभ्रम निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात २१ आणि २२ मार्चला दुकाने सुरू करण्यात आली. मात्र या बैठकीत मागणी पूर्ण न झाल्याचे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आल्याने जिल्ह्यात २३ मार्चपासून पुन्हा बंद पाळण्यात आला, अशी माहिती संघटनेचे सत्यम सोनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आर्थिक तडजोडीवरही परिणाम
सध्या शेतीची कामे बंद आहेत. अनेकांच्या हाताला काम नाही. सोबतच लग्नसराई आहे. त्यामुळे अनेकांना पैशाची गरज पडते. सराफा दुकाने सुरू असली की अनेकांना घरातील सोनेचांदी गहान ठेवून कर्ज उचलता येते. प्रत्येक गावात नागरिक असे करताना व आर्थिक जुळवाजुळव करताना यापूर्वी दिसून यायचे. आता मात्र सराफा दुकाने बंद असल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे.
लक्ष वेधण्यासाठी कॅन्डल मार्च
२ मार्चपासून आंदोलन सुरू असूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याचे पाहून सराफा व्यावसायिक विविध आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधत आहेत. आज बुधवारी चंद्रपूर जिल्हा सराफा व स्वर्णकार बचाव आंदोलनच्या वतीने चंद्रपुरात कॅन्डल मार्च काढण्यात आला. सराफा बाजार ते जटपुरा गेट आणि पुन्हा सराफा बाजारात येऊन कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी संघटनेचे राजेंद्र लोढा, मरजी लोणावत, भरत लोढे, ओमप्रकाश सोनी, समीर आकोजवार आदी व्यापारी सहभागी झाले होते.