‘इरई’च्या खोलीकरणाला पुन्हा प्रारंभ
By Admin | Updated: December 3, 2015 01:19 IST2015-12-03T01:19:55+5:302015-12-03T01:19:55+5:30
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील राख, वेकोलिच्या उत्खननातून निघणारी माती आणि नदी काठावर झालेल्या अतिक्रमणामुळे

‘इरई’च्या खोलीकरणाला पुन्हा प्रारंभ
आंदोलनाचे फलित : नदीला मिळणार संजीवनी
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील राख, वेकोलिच्या उत्खननातून निघणारी माती आणि नदी काठावर झालेल्या अतिक्रमणामुळे अस्थीपंजर झालेल्या इरई नदीला जीवनदान देण्यासाठी पुन्हा एकदा धडपड सुरू झाली आहे. या नदीच्या खोलिकरणाचे काम मे महिन्यात सुरू करण्यात आले होते. पावसाळ्यामुळे हे काम थांबविण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा खोलिकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. चंद्रपूर शहरासह नदीच्या काठावर वसलेल्या मानवी वस्त्यांची जीवनदायिनी असलेल्या या नदीला यामुळे संजीवनी मिळणार आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील राख, वेकोलिच्या उत्खनानातून निघणारी माती, आणि नदी काठावर झालेल्या अतिक्रमणामुळे अस्थीपंजर झालेल्या इरई नदीला जीवनदान देण्यासाठी पुन्हा एकदा धडपड सुरू झाली आहे. या नदीच्या खोलिकरणाचे काम मे महिन्यात सुरू करण्यात आले होते. पावसाळ्यामुळे हे काम थांबविण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा खोलिकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. चंद्रपूर शहरासह नदीच्या काठावर वसलेल्या मानवी वस्त्यांची जीवनदायिनी असलेल्या या नदीला यामुळे संजीवनी मिळणार आहे.
जेसीबीद्वारे नदीतील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जवळपास सात लाख क्युबिक मिटर गाळ काढला जाणार आहे. यामुळे नदीचे पात्र स्वच्छ व नेटके होऊन जलस्तर वाढण्यासाठी मदत होणार आहे. तसेच दरवर्षी पावसामुळे नदीकाठावरील नागरिकांना पुराचा सामना करावा लागत होता. त्याचीही तिव्रता या खोलिकरणामुळे कमी होणार आहे.
कोळसा खाणी, कोळशावर आधारित उद्योग, महाऔष्णिक वीज केंद्र यामुळे येथे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अलिकडच्या काळात चंद्रपूर शहरासह जिल्ह्याचा औद्योगिक विकास झाला. एमईएल, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, वेकोलिच्या कोळसा खाणी व चंद्रपूर एमआयडीसीमध्ये अनेक उद्योग आले. या उद्योगांतील दूषित पाणी इरई नदीतच सोडले जाऊ लागले. पठाणपुरा गेट बाहेर इरई नदीच्या पात्राला लागूनच वेकोलिचे मातीचे महाकाय ढिगारे तयार केले. या ढिगाऱ्यामुळे इरई नदीचे पात्रच बदलले. याशिवाय पावसाळ्यात इरई नदीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे अनेकदा इरई नदी कोपून चंद्रपूरकरांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. तरीही प्रशासनाला दखल घ्यावीशी वाटली नाही. या नदी पात्रातून सातत्याने रेतीचा उपसा केला जाऊ लागला. त्यामुळेदेखील इरई नदीवर विपरित परिणाम झाला. याशिवाय शहरातील केरकचरा याच नदीत टाकला जात होता. या सर्व प्रकारामुळे इरई नदीचे नैसर्गिक सौंदर्यच नष्ट झाले. सद्यस्थितीत या नदीचे दोन अतिशय लहान पात्र निर्माण झाले आहे. याशिवाय गाळ कधीच उपसण्यात न आल्याने सध्या या नदीत प्रचंड गाळ साचला आहे.
चंद्रपूर शहरात नानाविध संस्था सामाजिक कार्य करीत आहेत. चंद्रपूर जिल्हा प्रदूषित जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. विविध मुद्यांवर या संस्थांनी आजवर आंदोलने केली आहेत. मात्र जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या आणि प्रदूषणामुळे त्यांची होत असलेली वाताहात त्यांना अंतर्बाह्य अस्वस्थ करू शकली नाही. उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडला जातो. मात्र वाहती नदी डोळ्याआड करून तिचे वाटोळे होत असतानाही जीवनदायिनींना वाचविण्यासाठी प्रशासनाला गदगद हालविले जात नाही. बोटावर मोजण्याएवढ्या एकदोन जणांनी आपआपल्या परीने प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना पुढाऱ्यांची आणि प्रशासनाची फारशी साथ मिळाली नाही.
कुशाब कायरकर यांच्या ‘वृक्षाई’ व इरई नदी बचाव संघर्ष समितीने यासाठी आंदोलने केली. वृक्षाईचा ट्री बॉय अजिंक्य कायरकर याचा वाढदिवसच इरई नदीच्या पात्रात साजरा करून वृक्षाईने प्रशासनाचे लक्ष वेधले. याशिवाय समितीनेही इरई नदी पात्रात बसून आंदोलने केली.
‘लोकमत’ने इरई नदी पात्राची होत असलेली वाताहात वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाच्या निदर्शनात ही बाब आणून दिली. तसेच नगरसेवक तथा जलबिरादरीचे जिल्हा संयोजक संजय वैद्य यांनीदेखील या विषयात सातत्याने पाठपुरावा केला. (प्रतिनिधी)