मूल तालुका हागणदारी मुक्तीचा संकल्प
By Admin | Updated: April 16, 2016 00:38 IST2016-04-16T00:38:50+5:302016-04-16T00:38:50+5:30
केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प चालविला आहे.

मूल तालुका हागणदारी मुक्तीचा संकल्प
राज्यातील पहिला लोगो : संध्या गुरुनुले यांच्या हस्ते प्रकाशन
मूल : केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प चालविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे विशेष लक्ष असलेला मूल तालुका हागणदारी मुक्त व्हावा यासाठी पंचायत समिती मूलच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र लोगो तयार करुन हागणदारी मुक्त चळवळीला गती देण्याचे कार्य केल्याने मत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी व्यक्त केले.
मूल पंचायत समिती कार्यालयात आयोजित लोगो प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंचायत समिती मूलच्या वतीने ‘ग्राम उदय ते भारत उदय’ अभियान १४ ते २४ एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती निमित्त भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धीगंत करणे, पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांचा विकास व गरीबांचे जीवनमान उंचावणे आदी कार्यक्रम येत्या १० दिवस गावागावात घेण्यात येणार आहेत.
पंचायत समिती मूल येथे आयोजित ‘ग्राम उदय ते भारत उदय’ अभियानांची कार्यशाळा जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी, लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजू गेडाम, कृषी अधिकारी विवेक दुधे, जि.प. पंचायत विभागाचे समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, विस्तार अधिकारी जे.के. राऊत, राजू परसावार आदी उपस्थित होते.
मूल तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीमधील शौचालयाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी स्वतंत्र लोगोची निर्मिती करुन तालुका हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प पंचायत समितीने केला आहे. (तालुका प्रतिनिधी)