बल्लारपूरला स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प

By Admin | Updated: June 28, 2015 01:57 IST2015-06-28T01:57:47+5:302015-06-28T01:57:47+5:30

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. विकासात्मक कामाचा दर्जा सुधारण्यासाठी लोकसहभाग

Resolution of making a smart city in Ballarpur | बल्लारपूरला स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प

बल्लारपूरला स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प

बल्लारपूर : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. विकासात्मक कामाचा दर्जा सुधारण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी सर्व विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी समित्या गठीत करण्याचा मानस आहे. जनतेच्या मनात कायमस्वरूपी राहणाऱ्या कामावर भर देणार असून बल्लारपूरला स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प अर्थ, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे जाहिर केला. दरम्यान, नगरपालिका प्रशासनाने त्यांच्याकडे १२२ कोटी ८८ लाखांचा विकास आराखडा सुपूर्द केला.
येथील श्री बालाजी सभागृहात बल्लारपूर शहर विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विकास परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्यांनी विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन दिले.
यावेळी मंचावर नगराध्यक्ष छाया मडावी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, नगर परिषदेचे उपाध्यक्ष संपत कोरडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, नगरसेवक रेणुका दुधे, हरिश शर्मा, विनोद यादव, डॉ. सुनिल कुल्दीवार, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, प्रमोद कडू, शिवचंद द्विवेदी, निलेश खरबडे, उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ-ठुबे, मुख्याधिकारी जी.एन. वाहूरवाघ, तहसीलदार डी.एस. भोयर, न.प. गटनेता देवेंद्र आर्य, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजू भुजबळ यांच्यासह अधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती.
ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, कोणताही विकास करणे एकट्याचे काम नाही. सर्वसमावेशक टिमवर्क विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. शहरात वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांचे ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे काम हाती घेणार आहे. रस्ते बांधकाम, आरोग्य सेवा, प्रदूषण, वृक्षारोपण, दिवाबत्तीची सोय, क्रीडांगण, सांस्कृतिक क्षेत्र यासह अनेक ठिकाणी समित्यांचे गठन करून त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत अहवालानुसार विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे लोकसहभाग वाढीव लागेल, असा विश्वास व्यक्त करून १७ कोटी रुपये खर्च करून अद्यावत पोलीस ठाणे बनविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जी.एन. वाहूरवाघ व नगराध्यक्ष छाया मडावी यांनी बल्लारपूर शहराचा सन २०१४-१५ चा एकूण १२१ कोटी ८८ लाख रुपयाचा विकास आराखडा पालकमंत्र्याकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. यात प्रस्तावित रस्त्याचे काम, मजबुतीकरण, रूंदीकरण, गटारे व मोठे नाले बांधकाम, आठवडी बाजारातील व्यापारी संकुल, वाहनतळ बांधकाम, मुख्य मार्गावर दोन स्वागत गेट, स्मशानभूमि विकास, वर्धा नदीवर घाटाचे बांधकाम, शहरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, शालेय इमारतीचे नूतनीकरण, बचत भवनाचे नूतनीकरण, शहरातील चौकाचे सौंदर्यीकरण आदी कामांचा समावेश आहे.
निलेश खरबडे, हरिश शर्मा व अन्य उपस्थित नागरिकांनी विकास परिषदेदरम्यान शहर विकासाबाबत काही सूचना केल्या. अनेकांनी निवेदनाच्या माध्यमातून विकासाला हातभार लावण्यासाठी भूमिका मांडल्या. संचालन नगरपालिकेचे अधीक्षक किशोर जांभुळकर यांनी केले. अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Resolution of making a smart city in Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.