बंधाऱ्याला विरोध तरीही बांधकामाचा हट्ट
By Admin | Updated: April 8, 2016 01:01 IST2016-04-08T01:01:27+5:302016-04-08T01:01:27+5:30
चिमूर तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठे नदीच्या तिरावर असलेले गाव म्हणून नेरीची ओळख आहे.

बंधाऱ्याला विरोध तरीही बांधकामाचा हट्ट
मागणी : बंधारा नेरी सोनेगाव रस्त्यावर हलविण्यात यावा
नेरी : चिमूर तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठे नदीच्या तिरावर असलेले गाव म्हणून नेरीची ओळख आहे. या नदीवर मागील काही दिवसांपासून बंधारा बांधकामाच्या हालचाली सुरू होत्या. परंतु त्या बंधारा बांधकामामुळे गावातील टिळक वार्ड क्र. १ मधील नागरीकांना पुराचा धोका संभव असल्यामुळे त्या बंधाऱ्यास तेथील रहीवाशांनी विरोध दर्शविला. तरीही बंधारा बांधकामाचा हट्ट बांधला जात आहे.
आमदार बंडी भागंडिया, जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसीलदार चिमूर, उपअभियंता लघुपाटबंधारे विभाग चिमूर, तसेच ग्रामपंचायत नेरीला सुद्धा बंधारा बांधकाम करण्याची जागा बदलविण्याकरीता व बंधारा नेरी सोनेगाव रस्त्यावर हलविण्याकरीता निवेदन देण्यात आले. परंतु, त्या निवेदनावर कोणतीही कार्यवाही न करता पुन: त्याच ठिकाणी बांधकामाचा अट्टहास धरण्यात येत आहे.
दरवर्षी पावसाच्या दिवसात नदीला पूर आला की टिळक वार्ड क्र. १ मधील संपुर्ण नदीकाठावरील भागात रस्त्यांवर व रहिवाश्यांच्या घरामध्ये पाणी शिरत असते व त्याचा दरवर्षी रहिवाशांना सामना करावा लागतो. असे असतानाही लोकवस्तीजवळ बांधकाम करू नये असे निवेदन देण्यात आले.
या बंधाऱ्यामुळे वॉर्डातील लोकवस्तीला धोका उद्भवू शकतो, असे मत वॉर्डातील अनेक लोकांनी मांडले आहे. याकरीता गावातील नानाजी दडमल यांच्या नेतृत्वात वॉर्डातील रहिवाशांनी स्वत:च स्वाक्षरीसह निवेदन दिले. परंतु त्याच वेळेस त्या बंधाऱ्याचे बांधकाम व्हावे म्हणून वॉर्डातील काही दृष्टप्रवृत्तीच्या वॉर्डा व्यतीरिक्त लोकांच्या खोट्या सह्या करून निवेदन दिले व नुसत्या एकट्याच्या दबावात पुन: बांधकाम सुरू करण्यात आले, असे नानाजी दडमल यांनी सांगीतले.
या बंधारा बांधकामास भाजपा व काँग्रेस हे राजकारण करीत आहेत. नदीलगतच्या गावकऱ्यांचा विरोध असतानाही भाजपा व काँग्रेस हे यास श्रेष्ठतेचा मुद्दा करून बंधारा बांधण्याच अट्टहास असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)