७४३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST2021-02-05T07:40:14+5:302021-02-05T07:40:14+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ७४३ ग्रामपंचायतींचे आरक्षण शुक्रवारी तहसीलदारांनी जाहीर केले. सोडतीनुसार १४१ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर ...

७४३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
चंद्रपूर : जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ७४३ ग्रामपंचायतींचे आरक्षण शुक्रवारी तहसीलदारांनी जाहीर केले. सोडतीनुसार १४१ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर ३७३ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानापूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले नव्हते. त्यामुळे आरक्षण सोडतीकडे विविध राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. आरक्षण जाहीर झाल्याने आता सरपंचपदासाठी मोठी चुरस निर्माण होणार आहे.
बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण आणि महिला (अनूसचित जाती जमाती, नामप्र, सर्वसाधारण महिलांसह) प्रवर्गासाठी ७४३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यासाठी सर्व १५ तहसील कार्यालयांत दुपारी २ वाजेच्या सुमारास सभा घेण्यात आली. या सभेत संबंधित तहसीलदारांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण ८२५ पैकी ७४३ ग्रामपंचायती बिगर अनुसूचित, तर ८२ ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्रात येतात. या ग्रामपंचायतींमधील आठ प्रवर्गातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.
प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण
अनुसूचित जाती ५२
अनुसूचित जाती महिला ५३
अनुसूचित जमाती ७७
अनुसूचित जमाती महिला ७८
नागरिकांचा मागास प्रवर्ग १००
नामप्र महिला १०१
सर्वसाधारण १४१
सर्वसाधारण महिला १४१
सरपंचपदासाठी शक्ती पणाला
सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न करताच यंदा निवडणुका झाल्या. त्यामुळे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होणार, हा प्रश्न सर्वच उमेदवारांसाठी उत्सुकतेचा होता. विविध राजकीय पक्षांच्या समर्थकांनी निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. आता आरक्षण जाहीर झाल्याने आर्थिकदृष्ट्या तगडे उमेदवार सरपंचपदासाठी शक्ती पणाला लावणार आहेत.
आज ८२ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत
जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील ८२ ग्रामपंचायतींकरिता अनुसूचित जमाती व जमाती महिलांकरिता सरपंचपदाचे आरक्षण शनिवारी दुपारी २ वाजता काढण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी दिली.