लावारी तलावात विदेशी पक्ष्यांचा मुक्काम
By Admin | Updated: February 28, 2015 01:23 IST2015-02-28T01:23:15+5:302015-02-28T01:23:15+5:30
नोव्हेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या हिवाळ्याचा कालावधीत तळोधी (बा.) परिसरातील पक्षी मित्रांना नवनवीन पक्ष्यांचे दर्शन होत आहे.

लावारी तलावात विदेशी पक्ष्यांचा मुक्काम
तळोधी (बा.): नोव्हेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या हिवाळ्याचा कालावधीत तळोधी (बा.) परिसरातील पक्षी मित्रांना नवनवीन पक्ष्यांचे दर्शन होत आहे. यावर्षीच्या हिवाळ्यात तळोधी (बा.) परिसरातील तलावांमध्ये अनेक देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन झाल्याची नोंद घेण्यात आली.
तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील विविध प्रकारच्या पक्षांचे आगमन व येथील नैसर्गिक वनसंपदा भविष्यात पक्षीमित्रांसाठी पक्षी निरीक्षण करण्याचा प्रमुख क्षेत्र बनले तर नवल वाटायला नको. यंदाच्या सत्रात तळोधी वनपरिक्षेत्रात ब्लॅक स्टोक, ब्लॅक आयबीस, व्हाईट आयबीस, रिव्हर टॅन, कामन, पोचार्ड, हार्न बोल ब्लॅक, यासारख्या अनेक पक्षांच्या ७० हून अधिक जातीची नोंद वनविभागाकडे करण्यात आली आहे.
तळोधी (बा.) येथील जवाहर नवोदय विद्यालयातील अध्यापनाचे कार्य सांभाळीत पक्षी निरीक्षण हा छंद करणारे पक्षी अभ्यासक व्ही. के. पवार यांनी लावारी तलावात शेकडो ग्रेलेग्जूज पक्ष्यांचे वास्तव्य आढळून आल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रेलेग्जगूज हे पक्षी हिवाळ्याच्या दिवसात थंडीपासून बचाव करण्यासाठी, आपले भक्ष्य शोधण्यासाठी किंवा प्रजनन करण्यासाठी उत्तरेकडील थंड प्रदेशातून दक्षिणेकडील भागात नियमित स्थलांतर करतात. आपली प्रजाती टिकवून ठेवण्यासाठी या पक्षांना विशिष्ट परिस्थितीवर मात करुन हजारो किमीचे अंतर पार करणे गरजेचे असते. हे ग्रॅलेग्ज गूज जातीचे बदक यांना ग्रामीण भाषेत मोठी बाड्डी असेही म्हणतात.
८० सेमी उंच असलेला हा पक्षी अंगाने जाडजूड असतो. त्याचे पाय व चोंच गुलाबी रंगाचे तर पंख कथ्या व पांढऱ्या रंगाचे असून वजन तीन ते चार किलो पर्यंत असते. तरीदेखील हा पक्षी वेगाने भरारी घेऊन उडण्याचे कौशल्य त्यांच्यात असते.
युरोप, उत्तर अमेरिका, इंग्लंड, चीन व आशियातील अनेक देशात आढळणारा हा पक्षी उत्तर भारतात नियमित वास्तव्यास असून हिवाळ्यात दक्षिण भारतात स्थलांतर करीत असतो.
हे पक्षी तळोधी वनपरिक्षेत्रात मागील अनेक दिवसांपासून वास्तव्यास आहे. रात्री धान्य, किडे इतर मेजवानी केल्यानंतर दिवसा तळाच्या काठावर किंवा पाण्यात विश्रांती करतात. मनुष्यवस्तीपासून दूर एकांतात राहणे त्यांना आवडते. हा पक्षी स्वभावाने भित्रा असल्याने कोणतीही चाहूल लागताच या पक्षांचे थवे आकाशात वेगाने भरारी घेतात. आकाशात काही काळ घिरट्या घातल्यानंतर पूर्ण आश्वस्त झाल्याचा अंदाज घेवून पाण्यात उतरतात. किंवा इतरत्र दूरवर निघून जातात. हे पक्षी जमिनीवर डौलदार पणे वावरत असताना शिकाऱ्यांच्या नजरेतून सुटू शकत नाही. त्यामुळे त्याची शिकार करणे सोपे जाते. त्यामुळे पक्षीमित्र, गावकरी व वनविभाग कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नाने या पाहुण्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे, असे पक्षी मित्रांचे व पक्षी निरीक्षकांची मागणी आहे. (वार्ताहर)
लावारी येथील तलावात नर्सरी असून तिथे दिवसभर नर्सरी विभागाचे कर्मचारी हजर राहत असतात. त्यामुळे येथे पक्ष्यांची शिकार होणे शक्य नाही. पक्ष्यांच्या संरक्षणासाठी विशेष व्यवस्था नाही. परंतु पानवड्यांवर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून असतात.
तळोधी (बा.) परिसरात अनेक विदेशी पक्ष्यांचे वास्तव्य दिसून येते.
चारगाव (माना) येथील तलावात होलीनेक स्टार्क हे पक्षी वास्तव्याला असून त्यांनी या परिसरात आपला निवारा शोधला आहे, अशीही माहिती पक्षी निरीक्षक व्ही. के. पवार यांनी दिली आहे.