शिक्षक संघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
By Admin | Updated: October 11, 2015 02:21 IST2015-10-11T02:21:34+5:302015-10-11T02:21:34+5:30
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.

शिक्षक संघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
गोंडपिंपरी : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र हे काम शिक्षकांकडून काढून घेण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन गोंडपिपरी तालुका शिक्षक संघाच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले.
शिक्षण विभागाच्यावतीने अगोदरच विद्यार्थ्यांसाठी ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला. त्यातच चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने ‘मिशन नवचेतना’ पायाभूत चाचण्या व मूल्यमापन, मुलांचे वैयक्तिक निरीक्षण व नोंदी, प्रथम सत्र परीक्षा, सरल डाटाबेसअंतर्गत विद्यार्थी, शिक्षक व शाळेची सर्व माहिती आॅनलाईन अद्ययावत करणे आदी महत्त्वपूर्ण काम प्रत्येक शिक्षकांकडे असल्याने सध्या शिक्षक व्यस्त आहेत. त्यातच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम प्राथमिक शिक्षकांकडे सोपविल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यातच याप्रकारची अशैक्षणिक कामे प्राथमिक शिक्षकांवर लादल्याने नेमकी कोणती कामे करायची, असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे म्हणून अखिल गोंडपिंपरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने गोंडपिंपरीच्या तहसीलदारांना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम शिक्षकांकडून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रेमदास खोब्रागडे, सचिव बावणे, अभय कासनगोट्टूवार, मुरलीधर सरकार, शेखर दहिवले, योगेश पावसे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)