रिंगरोडला पर्याय उड्डाणपुलासाठी अहवाल मागविला
By Admin | Updated: December 23, 2016 00:47 IST2016-12-23T00:47:10+5:302016-12-23T00:47:10+5:30
चंद्रपूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण झालेला वाहतूक प्रश्न यासाठी शहराला वळण मार्गाची गरज आहे.

रिंगरोडला पर्याय उड्डाणपुलासाठी अहवाल मागविला
नाना श्यामकुळे यांची धडपड : अधीक्षक अभियंता नागपूर यांना शासनाचे पत्र
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण झालेला वाहतूक प्रश्न यासाठी शहराला वळण मार्गाची गरज आहे. मात्र ज्या भागातून वळण मार्ग प्रस्तावित होता, त्याच ठिकाणी आता लोकवस्ती झाली आहे. याला पर्याय म्हणून इरई नदी ते बंगाली कॅम्प पर्यंत साडेसहा किलोमीटरचा उड्डाणपुल बांधकाला मंजुरी द्यावी, अशी मागणी ना. नितीन गडकरी व राज्य शासनाकडे यांच्याकडे आ. नाना श्यामकुळे यांनी केली होती.
याबाबत शासन सकारात्मक असून उपविभागीय अभियंता तथा कर्यासन अधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक अभियंता सां. बा. नागपूर यांना पत्र पाठवून सर्वकष विचार करून उचीत कार्यवाही व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे पत्र पाठविले आहे.
चंद्रपूर शहराची वाढती लोकसंख्या तसेच औद्योगीकरण पाहता वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. १९८० मध्ये बायपाससाठी हॉटेल ट्रायस्टारच्या मागील भागातून तुकूम-शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाकडून जागा निश्चित करण्यात आली होती. या भागात आता जवळपास सातशे घरांची वस्ती आहे. इतकी मोठी वस्ती उठवून शहराच्या मध्यभागातून बायपास काढणे शक्य नसल्याने या बायपाससाठी स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. या भागातील वस्ती उठवून बायपास काढणे हे अन्यायकारक ठरणार असल्याने या बायपाससाठी मंजुरी देण्यात येऊ नये म्हणून उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने एक शपथपत्र दाखल करून बायपाससाठी नवीन जागेचा शोध सुरू असल्याचे म्हटले. मोरवा गावाच्या आतील भागातून लोहाऱ्यापर्यंत बायपास काढण्यात यावा, अशी सूचना होती. हे अंतर जवळपास ३५ किलोमीटरचे आहे. बायपाससाठी असलेल्या निकषामध्ये हे अंतर बसत नाही. त्यामुळे इरई नदी ते बंगाली कॅम्पपर्यंत उड्डाणपुलाची निर्मिती करणे हा एकमेव पर्याय आहे.
यासंदर्भात अनेक दिवसांपासून आ. नाना श्यामकुळे यांनी पाठपुरावा सुरू ठेवून निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपविभागीय अभियंता तथा कर्यासन अधिकारी यांनी १९ नोव्हेंबरला राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक अभियंता सां. बा. नागपूर यांना पत्र पाठवून सर्वकष विचार करून उचीत कार्यवाही व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे पत्र पाठविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)