वर्धा नदीवर शिवणी येथे बंधाऱ्यासाठी निवेदन
By Admin | Updated: January 6, 2017 01:18 IST2017-01-06T01:18:20+5:302017-01-06T01:18:20+5:30
वर्धा नदीपट्टयातील शेतीला सिंचन व्हावे तथा परिसरातील गावाचाा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा,

वर्धा नदीवर शिवणी येथे बंधाऱ्यासाठी निवेदन
उमाकांत धांडे यांची मागणी : पेल्लोरा-निर्ली रस्त्याचीही मागणी
राजुरा : वर्धा नदीपट्टयातील शेतीला सिंचन व्हावे तथा परिसरातील गावाचाा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, या हेतुने चंद्रपूर शहरापासून केवळ आठ कि.मी. अंतरावरील तालुक्यातील शिवणी (चोर) येथे वर्धा नदीवर बंधारा बांधण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव उमाकांत धांडे यांच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी शिवणी, धिडशी, निर्ली, चार्ली, पेल्लोरा, किनबोडी, कढोली (बु.) येथील शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन आणि ग्रामपंचायतीचे ठराव ना. अहीर यांना देण्यात आले. यासोबतच पेल्लोरा आणि निर्ली ही दोन गावे अद्याप रस्त्याने जोडली गेली नसल्याने हा रस्ता आणि साखरी- निर्ली रोडवरुन शंकरदेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे मागणीचे निवेदनही यावेळी देण्यात आले.
वर्धा नदीपट्टयातील जमीन सुपीक असून शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास येथील शेती समृद्ध होणार आहे. या परिसरात वेकोलिच्या खाणींमुळे भुगर्भातील पाण्याची पातळी आधीच खोलवर गेली आहे. शिवणी येथे वर्धा नदीवर बंधारा झाल्यास पाण्याची पातळी वाढण्यासोबतच नदीपलिकडील राजुरा व कोरपना तालुक्यातील गावांसोबरोबरच चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील गावांना सिंचनाचा लाभ होईल तथा पिण्याचे पाण्याचीही सोय होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
याबाबत शिवणी, धिडशी, पेल्लोरा, साखरी आणि चार्ली ग्राम पंचायतीने बंधारा मंजूर करण्याबाबत ठराव देखील संमत केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येऊन उमाकांत धांडे यांच्या नेतृत्वात निवेदन दिले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव उमाकांत धांडे, गुरुदेव सेवा मंडळाचे पुंडलिक काकडे, अमरनाथ पाटील जीवतोडे, चार्लीच्या सरपंच पोर्णिमा दुबे, उपसरपंच किशोर ढुमणे, कवडू पाटील कौरासे, सुरेश कौरासे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)