गडचांदूर शहर प्रदूषणाच्या विळख्यात

By Admin | Updated: December 22, 2014 22:44 IST2014-12-22T22:44:59+5:302014-12-22T22:44:59+5:30

गडचांदूर हे प्रदूषणाच्या कचाट्यात सापडलेले शहर आहे. सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात प्रदूषणाची तिव्रता प्रचंड वाढली आहे. वायू, जल आणि ध्वनी प्रदूषणाने नागरिकांचे जगणे असह्य झाले

Report of Gadchandur city pollution | गडचांदूर शहर प्रदूषणाच्या विळख्यात

गडचांदूर शहर प्रदूषणाच्या विळख्यात

आशिष देरकर - गडचांदूर
गडचांदूर हे प्रदूषणाच्या कचाट्यात सापडलेले शहर आहे. सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात प्रदूषणाची तिव्रता प्रचंड वाढली आहे. वायू, जल आणि ध्वनी प्रदूषणाने नागरिकांचे जगणे असह्य झाले असून प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी नगरपरिषदेने त्वरीत उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.
उद्योग जगतात अग्रेसर असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीमुळे येथील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने माणिकगडच्या वाढीव उद्योगाला परवानगी दिल्याने त्यात आणखीणच भर पडली आहे. त्यामुळे गडचांदुरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.
जड वाहतुकीमुळे फुटलेले रस्ते, कच्च्या रस्त्यावरील पार्किंग, सिमेंट कंपनी व वाहनांचा धूर यामुळे गडचांदुरात २४ तास वायु प्रदूषण असते. माणिकगड सिमेंट कंपनी ही अगदी शहरालगत असल्यामुळे कंपनीशी संबंधित सर्व बाबींचा शहराशी संबंध येतो. कंपनीमध्ये वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून निघणाऱ्या व रस्त्यावरील धुळीमुळे गडचांदूरवासी त्रस्त झाले आहेत.
घरात तर गृहिणींना सकाळ- सायंकाळ दोनदा साफसफाई करावी लागते. दारे, खिडक्या बंद असल्या तरी धूळ शिरते कुठून, असा प्रश्न गृहिणी करताना दिसतात. रोज कितीही स्वच्छता केली तरी घरातील टाईल्सवर धुळीचे कण आढळतात. हवेतील सिमेंटचे कण बाहेरील वाहनांवरही पडून राहतात.
कंपनीच्या सभोवताल वस्तीत बघितले तर घराच्या छतावर धुळीचे थर साचलेले आहे. कवेलूचा रंग बदलून काळा झाला आहे. त्यामुळे गडचांदुरवासीयांना मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. माणिकगडच्या वाढीव प्रकल्पामुळे गडचांदुरातील शिक्षक कॉलनीत नागरिकांना वास्तव्य करणे कठीण झाल्याचे नागरिक सांगतात. गडचांदुरातील शेती माणिकगड सिमेंटच्या धुरामुळे नेहमी करपून जात आहे. झाडांच्या पानावर सिमेंटचे कण पडून झाडांची वाढ खुंंटत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

Web Title: Report of Gadchandur city pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.