स्मशानभूमीवरून पुन्हा वाद
By Admin | Updated: February 3, 2016 00:57 IST2016-02-03T00:57:34+5:302016-02-03T00:57:34+5:30
दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इरई नदीच्या तीरावर असलेल्या व सध्या बंद असलेल्या स्मशानभूमीच्या मुद्यावरून पुन्हा वाद उफाळून आला आहे.

स्मशानभूमीवरून पुन्हा वाद
कुलूप तोडून शव जाळले : उद्या चंद्रपूर बंदचे आवाहन
चंद्रपूर : दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इरई नदीच्या तीरावर असलेल्या व सध्या बंद असलेल्या स्मशानभूमीच्या मुद्यावरून पुन्हा वाद उफाळून आला आहे. मंगळवारी या ठिकाणी कुलूप तोडून पोलीस बंदोबस्तात शव जाळण्यात आले. हा प्रकार दंडूकशाहीचा प्रत्यय देणारा असून याचा निषेध करीत ४ फेब्रुवारी रोजी काँग्रेसने चंद्रपूर बंदचे आवाहन केले आहे.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव अॅड. अविनाश ठावरी, काँग्रेसचे नगरसेवक अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, प्रशांत दानव, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे सचिव वसंत मांढरे आदींनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की चंद्रपूर शहराला लागून दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत इरई नदीच्या तिरावर भगवान बालाजींचे मंदिर, समोरच हनुमानाचे मंदिर, बाजुला चर्च, कान्व्हेंट, गायत्री देवस्थान व इतर धार्मिक स्थळे आहेत. याच ठिकाणी पाच लॉन्स आहेत. याशिवाय अनेक शाळा-महाविद्यालये या भागात आलेले आहेत. या भागाला तिर्थस्थानाचे स्वरुप आलेले आहे. महाकाली यात्रेला येणारे भाविक सकाळी येथेच स्नान व पूर्जा अर्चना करून महाकालीच्या दर्शनाला जाण्याची प्रथा आहे. हा परिसर दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. दाताळा ग्रामपंचायतीची स्वतंत्र स्मशानभूमी असल्यामुळे इरई नदी तिरावरील स्मशानभूमीचा कोणी उपयोग करीत नाही. नगरसेवक डोडाणी यांनी त्यांच्याच कुटुंबातील किंवा नातेवाईकांचे प्रेत जाळण्यासाठी वर्ष, दोन वर्षातून एखाद्यावेळी या स्मशानभूमीचा मुद्दाम उपयोग केला आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी दाताळा ग्रामपंचायतीने आमसभेत ही स्मशानभूमी बंद करून बालोद्यान तयार करण्यात यावे, असा एकमुखी ठराव करून जिल्हा परिषदेकडे पाठविला. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने याला मंजुरीही दिली. असे असताना नगरसेवक डोडाणी आणि त्यांच्या पाचदहा हस्तकांनी दंडूकशाहीचा वापर करीत कुलूप तोडून पोलील संरक्षणामध्ये मुद्दाम आज या ठिकाणी प्रेत जाळण्यात आल्याचा आरोप अॅड. ठावरी, नागापुरे, पडवेकर आदींनी केला आहे. याच्या निषेधार्थ चंद्रपूर बंदचे आवाहन आहे.(शहर प्रतिनिधी)