पुन्हा बसला पावसाचा तडाखा
By Admin | Updated: March 3, 2015 00:50 IST2015-03-03T00:50:06+5:302015-03-03T00:50:06+5:30
रविवारी चंद्रपूरसह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

पुन्हा बसला पावसाचा तडाखा
चंद्रपूर : रविवारी चंद्रपूरसह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे चंद्रपूर येथील मालधक्क्यावर गहू तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांत उघड्यावर असलेले धानाचे पोते भिजले. यामुळे अतोनात नुकसान झाले असून गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ५९९ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रविवारी दुपारच्या सुमारास चंद्रपुरात अचानक हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तर वरोरा, भद्रावती, चिमूर या तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पाऊस येणार नाही, असे चिन्ह दिसत होते. मात्र, रात्री ११ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस सुमारे अर्धा ते पाऊण तास सुरू होता. पावसामुळे रेल्वे मालधक्यावर उघड्यावर असलेला गहू भिजला तर रबी पिकांचेही मोठे नुकसान झाले. गहू, हरभरा, तूर आदी पिके अंतिम टप्यात आहेत. मात्र, पावसामुळे या पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सावली तालुक्यात रात्री दोन वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील रबी पिकांना फटका बसला आहे. खरीप हंगामात कोरडा दुष्काळ आणि रबी हंगामात अवकाळी पावसाचा फटका बसल्याने हाती आलेले पीक गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. चालू वर्षात यापूर्वीही अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शासनाने नुकसानग्रस्तांसाठी मदत जाहीर केली. मात्र, ही मदत अत्यल्प असल्याने शेतकरी निराश झाले आहेत.
चिमूर तालुक्यातील विरूर स्टेशन परिसरातही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ‘पिकली तर शेती, नाही तर माती’ या म्हणीचा प्रत्यय परिसरात दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे परिसरातील कपाशी, जवस, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, मुंग, मोट, मिरची आदी रबी पिकांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट कोसळले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
अवकाळी पावसामुळे रबी पिकांना नक्की फटका बसला आहे. हरभरा पिकाला पावसामुळे माती लागली आहे. तर गहू पिकावरही पावसाचा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे मालाच्या दरावर परिणाम पडेल.
- पी. एन. येरगुडे
तालुका कृषी अधिकारी, चंद्रपूर.
चंद्रपुरात रस्त्यांवर पाणी
अवकाळी मुसळधार पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. चंद्रपुरातील अनेक मुख्य मार्गावरील गटारे कचऱ्याने तुंबली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाऊ शकले नाही. परिणामी पाणी रस्त्यावरून वाहून गेले. तुकूम परिसरातील गटारे कचऱ्याने तुंबलेली असल्याने ऊर्जानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी वाहत होते.
गरिबांचा गहू भिजला
शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी चंद्रपूर येथील रेल्वे मालधक्यावर शेकडो क्विंटल गहू उतरविण्यात आला होता. मात्र, अचानक पाऊस झाल्याने गव्हाचे सर्व कट्टे पाण्याने भिजले. कट्यांवर प्लॉस्टीक झाकण्यात आली होती. मात्र, जागेवरच पाणी साचल्याने शेकडो क्विंटल गहू भिजला. मालधक्यावर उतरलेला माल ठेवण्यासाठी चबुतरा नाही. त्यामुळे आलेला माल हा जमीनीवरच ठेवला जातो. गहू भिजल्यानंतर कंत्राटदारांनी सोमवारी दुपारी मालाची उचल केली.