विद्यार्थ्याला नापास केल्याचे माऊंटचे पुन्हा एक प्रकरण उघड
By Admin | Updated: July 11, 2017 00:26 IST2017-07-11T00:26:31+5:302017-07-11T00:26:31+5:30
येथील माऊंट कारमेल कान्व्हेंट हायस्कूलचे उत्तीर्ण विद्यार्थ्याला नापास केल्याचे पुन्हा एक प्रकरण सोमवारी पुढे आले आहे.

विद्यार्थ्याला नापास केल्याचे माऊंटचे पुन्हा एक प्रकरण उघड
पोलिसात तक्रार : १३ मुलांना नापास केल्याचा राजेश जैन यांचा दावा, मुख्याध्यापिकेला जामीन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील माऊंट कारमेल कान्व्हेंट हायस्कूलचे उत्तीर्ण विद्यार्थ्याला नापास केल्याचे पुन्हा एक प्रकरण सोमवारी पुढे आले आहे. आपल्या मुलाला ५४.५४ टक्के गुण असतानाही त्याला नववीमध्ये नापास केल्यामुळे त्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप राजेश जैन या पालकाने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी त्यांनी शाळेतील १३ विद्यार्थ्यांना अशाचप्रकारे नापास केल्याचा दावाही जैन यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्राप्त गुणपत्रिकेच्या आधारे केला आहे.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून माऊंट कारमेल कान्व्हेंट हायस्कूल प्रशासकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील किती विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले व कोणत्या कारणांसाठी देण्यात आले, याबाबींची चौकशी करण्याची मागणीही यावेळी जैन यांनी केली. ते म्हणाले, लहान मुलगा धर्मांशु हा २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात सदर शाळेत नवव्या वर्गात शिकत असताना अंतिम परिक्षेचा निकाल घेण्यासाठी गेलो असता मुख्याध्यापिकेने गुणपत्रिका न दाखविता मुलगा नापास झाल्याचे सांगितले. यानंतर त्यांना वारंवार मुलाची गुणपत्रिका व त्याने सोडविलेले पेपर दाखविण्याची विनंती केली, परंतु आजपर्यंत ती दाखविली नाही. त्यांना मुलाच्या भविष्याबाबत विचार करा, असे म्हटले, तर मुख्याध्यापिका नित्या यांनी शाळेत आॅडिटोरियम हाल बनविण्याकरिता २५ हजार रुपये फंड मागितला. फंड न दिल्यास टीसी देतो, असे म्हणाल्या, असा गंभीर आरोपही जैन यांनी यावेळी केला. २५ हजार रुपये देण्यास असमर्थता दर्शविली असता धर्मांशुची टीसी दिली. त्यावर ‘नीड्स इन्प्रुवमेंट इन स्टॅन्डर्ड नाइन’ असे नमुद असल्याचे ते म्हणाले. बिल्डींगच्या बांधकामाकरिता २५ हजार दिले नाही म्हणूून मुलाला नापास केल्याचा गंभीर आरोपही जैन यांनी केला. राजेश ठाकूर या पालकाने दाखल केलेल्या प्रकरणात मुख्याध्यापिका नित्या जोसेफ व शिक्षिकेला सना खत्री यांना जिल्हा न्यायालयाने अंतरिम जामीन मिळाल्याची माहिती सूत्राने दिली.
शिक्षणाधिकाऱ्यांकडील गुणपत्रिकेत उत्तीर्ण
माहितीच्या अधिकारातही मुलाचे पेपर दिले नाही. नवव्या वर्गातून टीसी दिलेल्या युवराजच्या वडील राजेश ठाकूर यांच्याकडून माऊंट कॉन्व्हेंटच्या १३ मुलांना नापास केले. त्याची गुणपत्रिका शिक्षणाधिकाऱ्याकडून प्राप्त केली. धर्मांशु याला इंग्रजीत ५३.३, हिंदी ६८.७, सायन्स ५३.३, सोशल सायन्स ५२.७ टक्के गुण असल्याचे दिसून आले. तेव्हा आपला मुलगा नापास झाला नसल्याचे उघड झाल्याचेही राजेश जैन म्हणाले.
१७ नंबरचा फार्म भरून दहावीची तयारी
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र घेऊन चंद्रपूर येथील इतर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले असता कुठेही प्रवेश मिळाला नाही. यामुळे मुलाची मानसिक स्थिती खालावली असल्याचा गंभीरही राजेश जैन यांनी केला.अखेर वर्ष वाया जाईल, या भीतीने १७ नंबरचा फार्म भरून धर्मांशु दहाव्या वर्गाची तयारी करीत असल्याची माहिती जैन यांनी दिली.