जिवती : वृक्षांनी नटलेल्या पर्वतरांगा धुक्याची मंद झालर अन् पाखरांच्या मुंंजळ स्वरांनी मनाला पडणारी भुरळ... सुर्यस्ताने विहगंम दृष्य या साऱ्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेला माणिकगड किल्ला येथे येणाऱ्या पर्यटकांना मोहित करुन टाकते. मात्र अलिकडे येथे अनेक समस्या निर्माण झाल्याने पर्यटकांनी पाठ दाखविली आहे.आंध्र-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या जिवती तालुक्यात माणिकगड किल्ला आहे. आजुबाजुनी निसर्गाने रमलेला स्थळ मनाचा थकवा दूर करते. अप्रतिम सांैदर्यात पर्यटकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ येथील माणिकगड किल्ल्यात आहे. मुख्य रस्त्याच्या पूर्व व खालच्या बाजुला २०० मिटर अंतरावर हेमाडपंथी विष्णूचे मंदिर आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीगृहातून पाहिल्यास हा परिसर विलोभनीय वाटतो. निर्सगाने नटलेला हा परिसर डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी पर्यटक येतात. मात्र येथे पाहिजे त्या प्रमाणात सोयी-सुविधा नसल्याने काहीसे हिरमसुले होऊन परतात. गडचांदूर जिवती या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर हा किल्ला आहे. येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहली, पर्यटक, भाविक मंडळीची मोठी गर्दी असते. दरवर्षी या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम घेतला जातो. माणिकगड किल्ल्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला असला तरी येथे फासशा सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. माणिगकड किल्ल्यावरील वाढत्या भेटी लक्षात घेता या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देणार का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.किल्ल्यालगतच असलेल्या अंमलनाला धरणामुळे येथील शेतकरी आनंदीत झाला होता. मात्र शासनाने त्या धरणाचे पाणी सिमेंट कंपनीला पुरवित असल्याने शेतकऱ्यांना निराश व्हावे लागत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांपेक्षा धरण सिमेंट कंपनीलाच जीवनदायी ठरला आहे. त्याचबरोबर या परिसराला लाभलेली नैसर्गिक वनसंपदा धरणाच्या सौदर्यात आणखी भर ठाकत आहे. पण त्याचबरोबर धरणाच्या कठड्यावर बसून सुर्यास्ताने होणारे दर्शन तर एक अनोखी पर्वणीच आहे. त्यामुळे परिसराला पर्यटनदृष्टया एक आगळे वेगळे महत्त्व झाले आहे. या धरणावर पर्यटकांच्या विसाव्यासाठी विश्रामगृहाची सोय नाही. जलविहारासाठी नौका नाही याकडे संबंधितांनी तातडीने लक्ष पर्यटकांसाठी सुख सोयी उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
माणिकगड किल्ल्याची दुरुस्ती करा
By admin | Updated: November 8, 2014 01:02 IST