येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST2021-03-13T04:52:38+5:302021-03-13T04:52:38+5:30
कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ...

येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा
कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
राजस्व अभियान सुरू ठेवण्याची मागणी
जिवती : तालुका प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालयात राजस्व अभियान राबविण्यात येत होते. या अभियानामुळे परिसरातील नागरिकांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाजामुळे अनेक प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने त्यांना कागदपत्र लागणार आहेत.
प्रवासी निवाऱ्यांचा प्रस्ताव तयार
वरोरा : बहुतांश मोठ्या गावांमध्ये बस जाते; पण बसथांब्यावर प्रवासी निवारे नसल्याने नागरिकांचे हाल होतात. विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. अनेक ग्रामीण भागातील प्रस्ताव सादर करण्यात आल्याने समस्या सुटणार आहेत.
ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
सावली : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच सावलीतील अनेक विद्युततारा लोंबकळल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युतपुरवठा खंडित होतो. कृषिपंपधारक शेतकरी रबी पिकाची तयारी करीत आहे. अशावेळी अखंडित वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
मुख्य चौकात मोकाट जनावरांचा ठिय्या
टेमुर्डा : येथील चौपदरी महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. जनावरांमुळे अनेक दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे
वर्दळीच्या रस्त्यावर वाढले अतिक्रमण
वरोरा : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. कोरोनानंतर प्रशासनाने शिथिलता दिल्याने वाहने रस्त्यावर धावत आहेत. परंतु, रस्त्याच्या कडेला काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. लग्नाच्या खरेदीसाठी ग्राहक आता बाजारात येत आहेत. मात्र वाहने रस्त्यावरच ठेवत असल्याने अडचणी वाढत आहेत.
डोणी मार्गावरील डांबरीकरणाला जागोजागी खड्डे
मूल : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या डांबरी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या मार्गावरून नागरिकांची रहदारी कमी असतानाही रस्त्याचे तीन तेरा वाजले कसे, असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
चंद्रपूर - भोयगाव - कोरपना बसफेऱ्या वाढवा
कोरपना : चंद्रपूरवरून कोरपनासाठी जादा फेऱ्या सोडण्यात याव्यात, अशी प्रवाशांकडून होत आहे. भोयगाव हा तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत जवळचा मार्ग आहे. त्यामुळे नियमित प्रवासी जाणे-येणे करतात. मात्र, या मार्गावर अत्यल्प बसेस धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या मार्गावरील दाताळा, पिपरी, धानोरा, भोयेगाव, भरोसा, इरई, एकोडी, अंतरगाव, सांगोडा, वनोजा, नारडा नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बसफेऱ्या सुरु करण्यात याव्या, अशी मागणी आहे.
कोरपना-उमरेड बसची मागणी
चंद्रपूर : कोरपना येथून वणी-चिमूरमार्गे उमरेड बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या बससेवेमुळे कोरपना येथील नागरिकांसह वणी, वरोरा, चिमूर परिसरातील प्रवाशांना सोईचे होईल. यासंदर्भात आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे.
गावफलक लावण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग, तालुका मार्ग, ग्रामीण मार्ग गेले आहेत. मात्र, यातील बहुतांश रस्त्यावर गावाच्या नावाचा फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असते. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
मोकाट श्वानांचा धुमाकूळ
राजुरा : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट श्वानांचा धुमाकूळ सुरू आहे. हे श्वान मुख्य मार्गावर मुक्त संचार करीत असून, ते रस्त्यावर इकडे-तिकडे भटकत असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. रस्त्याच्या कडेला हे श्वान कळपाने असतात. अनेकवेळा रात्री दुचाकींच्या मागे धावतात. ग्रामपंचायतीने या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.