मामा तलावांच्या दुरूस्तीने सिंचनाचे भाग्य उजळणार
By Admin | Updated: December 26, 2015 01:18 IST2015-12-26T01:18:42+5:302015-12-26T01:18:42+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात १३२ मामा तलाव जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत आहेत. या मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने अलिकडेच आखला आहे.

मामा तलावांच्या दुरूस्तीने सिंचनाचे भाग्य उजळणार
योग्यरीत्या व्हावी कामे : शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा
सावली : चंद्रपूर जिल्ह्यात १३२ मामा तलाव जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत आहेत. या मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने अलिकडेच आखला आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा तोकडी असल्याने त्यांच्यावर कामाचा भार वाढणार असून मामा तलावापासून संपूर्ण सिंचन होईल का, असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून केला जात आहे.
मामा तलावांची दुरुस्ती या विषयात गाळ उपसणे, मुरुम टाकणे, गवत कापने या कामांचा समावेश आहे. मात्र याचा सरळ फायदा अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या पलिकडे शेतकऱ्यांना होईल, असे दिसत नाही. शेतीच्या सिंचनाशी या तलावाच्या दुरुस्तीचा काही एक संबंध नाही, असे तज्ञांचे मत आहे. पाणी वाटप करण्यासाठी शासनाने पाणी वापर संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सुमारे २५० नोंदणीकृत संस्था अकार्यक्षम ठरल्या आणि त्या अवसायानात निघाल्या आहेत. त्यामुळे नवीन कामे करताना याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
शासनाने दुरुस्तीचे दरपत्रक अजूनही सुधारीत केले नाही. सुमारे २००३ पासून प्रती हेक्टर २८ हजार रुपये दुरुस्तीचा दर ठरविण्यात आला असून अजूनही तोच दर कायम आहे. ५० हजार रुपये वाढीव दर प्रस्तावित आहे. परंतु अजूनही त्याच्यात दुरुस्ती करण्यात आलेली नाही, त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून किती तलावाचे भाग्य पलटून शेतकऱ्यांना कितपत लाभ होईल, याची प्रतीक्षा आहे.
पाटचाऱ्यांचीही व्हावी दुरुस्ती
मामा तलावाच्या दुरुस्तीसाठी जिल्ह्यात १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २८ कोटी रुपयाचा निधी देण्यात आल्याची माहिती आहे. परंतु, ज्या यंत्रणेकडून ही कामे करण्यात येणार आहेत, त्यांच्याकडे कामे किती, मनुष्यबळ किती याचाही विचार होण्याची गरज आहे. तलावाच्या दुरुस्तीचेच कामे न करता त्यात पाटचाऱ्याही दुरुस्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाटचाऱ्या दुरुस्त झाल्या नाही तर तलावाची कितीही दुरुस्ती केली तरी शेतापर्यंत पाणी पोहचणे कठीण होईल आणि पर्यायाने पाणी उशीरा मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होतच राहील.
संपूर्ण सिंचन क्षमता निर्माण व्हावी
पूर्वीच्या काळात मालगुजारांनी ज्या तलावांची निर्मिती केली, ती केवळ संरक्षित सिंचनाकरीता केली आहे. संरक्षित सिंचनाकरीता तयार करण्यात आलेल्या मामा तलावातून मिळणारे पाणी पिकाच्या शेवटच्या कालावधीत एकदाच मिळते. परंतु संपूर्ण सिंचन करावयाचे असल्यास किमान तीन पाळीत पाणी देणे आवश्यक असते. त्यामुळेच मामा तलाव संपूर्ण सिंचन करण्यास समर्थ ठरणे आवश्यक आहे.
तलावांचे लघु पाटबंंधारे म्हणून रूपांतरित करावे
मामा तलावांची दुरुस्ती करण्यासाठी पहिल्यांदा त्या तलावांचे लघु पाटबंंधारे म्हणून त्यांना रुपांतरीत करणे महत्त्वाचे आहे. तलावांचे शासकीय दृष्टीकोनातून सर्व्हेक्षण करावे, सांडव्यांचे नवनीकरण करावे अशा प्रकारच्या अनेक उपाययोजना तज्ञांनी सुचविल्या आहेत.