३० पूर्वी थकीत कर्जाचे पुर्नगठन करावे
By Admin | Updated: April 23, 2016 00:53 IST2016-04-23T00:53:28+5:302016-04-23T00:53:28+5:30
२०१५ मध्ये खरीप पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते, अशा शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली

३० पूर्वी थकीत कर्जाचे पुर्नगठन करावे
दीपक म्हैसेकर : कर्ज वाटप संदर्भात बैठक
चंद्रपूर : २०१५ मध्ये खरीप पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते, अशा शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली नसेल अशा शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या पीक कर्जाचे पाच हप्ते पाडून देण्यात यावे. त्यांना पाच वर्षापर्यंत हप्त्याची परतफेड करण्याच्या सूचना देण्यात याव्या. तसेच २०१६ या खरीप हंगामासाठी थकीत कर्जदारांना ३० एप्रिलपूर्वी नव्याने पीक कर्जाचे पुर्नगठन करुन देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले.
शुक्रवारी पीक कर्ज पुर्नगठन बैठकीत ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष व गटसचिव, तालुक्याचे सहाय्यक निबंधक, बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व निरीक्षक यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा उपनिबंधक आर. डी. कौसडीकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बरबटकर व जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुबेसिंग उपस्थित होते.
२०१६ या वर्षाच्या खरीप पीक कर्जाचे पुर्नगठन करताना कोणत्याही शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये, ज्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च पूर्वी कर्जाची परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना तातडीने कर्जाचे वाटप करण्यात यावे, अशा प्रकारचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या. (स्थानिक प्रतिनिधी)