रॅलीतून दिला वीज बचतीचा संदेश
By Admin | Updated: January 18, 2016 01:09 IST2016-01-18T01:09:00+5:302016-01-18T01:09:00+5:30
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाद्वारे विद्युत सुरक्षा विषयावर जनतेचे प्रबोधन होण्यासाठी शनिवारी वाहनरॅली काढण्यात आली.

रॅलीतून दिला वीज बचतीचा संदेश
वीज सुरक्षा सप्ताह : शहरातील प्रमुख मार्गांनी फिरली रॅली
चंद्रपूर: महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाद्वारे विद्युत सुरक्षा विषयावर जनतेचे प्रबोधन होण्यासाठी शनिवारी वाहनरॅली काढण्यात आली. या रॅलीस, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना शामकुळे यांनी हिरवी झेंडी दाखवली व रॅलीचा शुभारंभ झाला.
ही रॅली महावितरणच्या बाबुपेठ येथील परिमंडळ कार्यालयापासून निघून महाकाली मंदिर, गिरणार चौक, गांधी चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकातून संत कंवलराम चौकमार्गे इंदिरा गांधी गार्डन स्कूल रामनगर येथे विसर्जित झाली. इंदिरा गांधी गार्डन स्कूल रामनगर येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना महावितरण, विद्युत निरीक्षक कार्यालय चंद्रपूर, महानिर्मिती यांच्या संयुक्त विद्यमाने वीज सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
११ ते १७ जानेवारीदरम्यान महावितरणच्या सर्व कार्यालयात विद्युत सुरक्षा सप्ताहा पाळण्यात आला.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम सर्वत्र राबविण्यात आले. याप्रसंगी महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या मुख्याध्यापिका जयकुमार तसेच प्रशासकीय अधिकारी जयकुमार, चंद्रपूर परिमंडळाचे अधीक्षक अभियंता हरिश गजबे, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. घोगरे, महानिर्मितीच्या अधीक्षक अभियंता बोरकर, चंद्रपूर विभागाच्या कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार, बल्लारपूर विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन चोपडे, वरोरा विभागाचे कार्यकारी अभियंता डब्ल्यू. जी. नगराळे, कार्यकारी अभियंता (सुरक्षा) काकाजी रामटेके, कार्यकारी अभियंता (चाचणी विभाग) अजय खोब्रागडे, विद्युत निरीक्षक विनय नागदेवे तसेच महावितरण, महानिर्मिती, विद्युत निरीक्षक व शासकीय विद्युत कंत्राटदार, महावितरण, महानिर्मिती कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षेची शपथ दिली व आपल्या वडीलधाऱ्यांना तसेच धाकट्यांना वीज सुरक्षेचे उपाय अवलंबण्यास प्रोत्साहित करण्याचे त्यांना आवाहन केले.
अंबुजा सिमेंटचे अग्निशमन अधिकारी सिंग, देशमुख व महाजन यांनी वीज अपघात घडून आग लागल्यास करण्यात येणाऱ्या प्रथमोपचारांबद्दल माहिती दिली. तर महावितरणचे अधीक्षक अभियंता हरीष गजबे यांनी विद्यार्थ्यांना वीज सुरक्षेबद्दल सखोल मार्गदर्शन केले. महानिर्मितीच्या पथनाट्याद्वारे वीज सुरक्षेबाबत, रंजक व विद्यार्थ्यांना सहज समजेल, अशा भाषेत वीज सुरक्षा उपायाबद्दल अवगत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंदिरा गांधी गार्डन स्कूलचे संचालक राहुल पुगलिया, शाळेच्या मुख्याध्यापिका जयकुमार, प्रशासकीय अधिकारी जयकुमार तसेच शाळेचे शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.
विशेष म्हणजे, या रॅली वीज कर्मचाऱ्यांसह नागरिकही सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)