मूलभूत हक्कापासूनच नागरिक दूर
By Admin | Updated: January 27, 2015 23:31 IST2015-01-27T23:31:25+5:302015-01-27T23:31:25+5:30
चंद्रपूर शहराचा विकास असंतुलित असल्याचे सध्या दिसून येत आहे. सर्व प्रभागासाठी एकच महानगरपालिका असतानाही काही प्रभागात विकास एकवटल्याचे दिसते. त्यामुळे काही प्रभाग अजूनही

मूलभूत हक्कापासूनच नागरिक दूर
रवी जवळे - चंद्रपूर
चंद्रपूर : चंद्रपूर शहराचा विकास असंतुलित असल्याचे सध्या दिसून येत आहे. सर्व प्रभागासाठी एकच महानगरपालिका असतानाही काही प्रभागात विकास एकवटल्याचे दिसते. त्यामुळे काही प्रभाग अजूनही अविकसित आणि दुर्लक्षित आहेत. चंद्रपूर महानगरपालिका हद्दीच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभागातही याचाच प्रत्यय येतो. येथील नागरिकांना आजही आपल्या मुलभूत हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे. या प्रभागातील अनेक वस्त्यांमध्ये विकास झालेला नाही. रस्ते, नाल्यांचाच प्रश्न अद्याप सुटू शकला नाही. या प्रभागात बोटावर मोजण्याइतक्या भागातच थोडीफार विकासाची कामे झाली आहे. टॉवर टेकडी परिसर तर विकासापासून कोसोदूर असल्याचे दिसून येते. येथे रस्ते, पाणी, नाल्या, पथदिवे असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.
महानगरपालिकेच्या तिजोरीत दरवर्षी कोट्यवधीचा निधी येत असला तरी शहरात विकासकामे करायला महानगरपालिका प्रशासन का कमी पडत आहे, तेच कळत नाही. मनपा प्रशासन नागरिकांकडून विविध टॅक्स न चुकता वसूल करते. नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांचा निधीही शासनाकडून प्राप्त करते. मात्र नागरिकांना मुलभूत सोई-सुविधा पुरविल्या जात नाही. लोकमतच्या ‘लोकमत जागर’ या अभियानात सातत्याने याचा प्रत्यय येत आहे. परिणामी नागरिक चांगलेच संतापलेले दिसून येतात.
लोकमत चमूने आज मंगळवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभागात फेरफटका मारला. यावेळी नागरिकांनी मनपा प्रशासनाविरुध्दचा आपला संतापच लोकमतजवळ व्यक्त केला. या प्रभागातील टॉवर टेकडी परिसरात एकही मुलभूत गोष्ट मनपा नागरिकांना पुरवू शकलेली नाही. संपूर्ण टॉवर टेकडी परिसरातच रस्त्यांचा प्रश्न बिकट आहे. एकही रस्ता चांगला असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले नाही. एका रस्त्यावर डांबरीकरण केव्हातरी केले असावे. आता केवळ या रस्त्यावर गिट्टीच वर आल्याचे दिसते. उर्वरित रस्त्यांना तर रस्ते म्हणणेही संयुक्तिक होणार नाही. नागरिकांना आपल्या घरी पायवाटेच जावे लागते. मातीची पायवाटच येथील नागरिकांसाठी रस्ते आहेत. या ठिकाणी रस्ते नाही तर नाही; पण नाल्याही कुठे दिसत नाही. काही लोकांनी सांडपाण्यासाठी आपल्याच खर्चाने पाईप बसविले आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहते.
टॉवर टेकडी परिसरात आणखी एक समस्या मोठी आहे. हा परिसर जंगलाला लागून असून शहराच्या शेवटच्या टोकावर आहे. मात्र या परिसरात पथदिवे लावण्याचे सौजन्य महानगरपालिकेने दाखविले नाही. कुठेच पथदिवे नसल्याने संपूर्ण परिसरातच रात्री अंधाराचे साम्राज्य असते. याबाबबत नगरसेवकांना वारंवार सांगितले तरीही नगरसेवक लक्ष देत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
टॉवर टेकडी वगळता इतर परिसरातही फारसा विकास झाल्याचे दिसले नाही. आंबेडकर नगर वॉर्डात थोडेफार रस्ते व नाल्यांची कामे झाली आहे. मात्र संत फकीर चौक, संत विक्तुबाबा मठ या परिसरातील रस्ते उखडलेले आहेत. नाल्याही तुटलेल्या आहे. माता नगर चौक व सम्राट चौकातही तीच स्थिती आहे. येथील नाल्यांची डागडुजी गरजेची आहे. सिध्दार्थ नगरातीलही रस्ते उखडलेले दिसले.