महासमाधीचे पावित्र्य राखण्यासाठी वळणमार्ग काढा
By Admin | Updated: December 4, 2015 01:28 IST2015-12-04T01:28:29+5:302015-12-04T01:28:29+5:30
धुळे-कलकत्ता या सहाव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय मार्ग विस्तारिकरणाचे काम नागपूर-अमरावती मार्गावरील गुरूकुंज मोझरी ...

महासमाधीचे पावित्र्य राखण्यासाठी वळणमार्ग काढा
गुरुदेवभक्तांचे वित्तमंत्र्यांना निवेदन : जनभावनेची दखल घ्या
चंद्रपूर: धुळे-कलकत्ता या सहाव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय मार्ग विस्तारिकरणाचे काम नागपूर-अमरावती मार्गावरील गुरूकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळावरून जात आहे. मार्ग विस्तारिकरण करताना समाधीस्थळाची तोडफोक करण्याऐवजी वळणमार्ग काढा; राज्यातील गुरूदेवभक्तांच्या भावना आणि या समाधीस्थळाचे पावित्र्य जपा, अशी विनंती करणारे निवेदन गुरुदेवभक्तांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.
एरवि औद्योगिक प्रकल्पांसाठी राज्य मार्ग विदर्भात बदलण्यात आले आहेत. उद्योगांसाठी सरकार अशी शिथिलता दाखवित असताना दुसरीकडे महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या राष्ट्रसंताच्या समाधीस्थळाबाबत निर्णय शिथिलता दाखवित नसेल तर हा निर्णय लक्षावधी गुरूदेवभक्तांच्या भावनांचा कडेलोट करणारा ठरू शकतो, अशी भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
अखील भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी लक्ष्मणराव गमे, दत्ता हजारे, ग्रागिताचार्य बंडोपंत बोढेकर, प्रेमलाल पारधी, उषाताई हजारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवेदन देण्यात आले. राज्य मार्ग तयार करताना गुरूकुंज मोझरीतील महासमाधीस्थळ परिसराजवळून वळणमार्ग बांधण्याची विनंती गुरूदेवभक्तांनी यावेळी केली. महामार्गाच्या विस्तारिकणामध्ये महासमाधीची जागा येत आहे. यामुळे तोडफोड होण्याची शक्यता आहे. ही विटंबना टाळण्यासाठी मार्ग वळविण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होत आहे.
१९३६ मध्ये या आश्रमाची पायाभरणी राष्ट्रसंतांनी केली होती. आश्रमाला लागूनच त्यांनी गुरूदेवनगर या आदर्श गावाची स्थापना केली होती. या स्थळाला तत्कालिन नेतेमंडळींनी भेटी दिल्या होत्या. अ.भा. गुरूदेव सेवामंडळाच्या माध्यमातून देशभरातील २५ हजार शाखांच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचे कार्य सुरू आहे. राष्ट्रसंतांनी स्थापन केलेला आश्रम आणि त्यांची महासमाधी यातून राष्ट्रीय महामार्ग जात आहे. राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाला पाच लाखांवर भाविक असतात. दररोज हजारो गुरूदेवभक्तांची वर्दळ असते. हे स्थळ महामार्गाने विभाजित झाल्यास या स्थळाचे पावित्र्य नष्ट होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या आणि ग्रामगितेसारख्या ग्रंथांतून समाजाला संदेश देणाऱ्या राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळाचे सरकारने जतन करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. या प्रकरणी आपण लक्ष घालून सरकारकडे भावना कळवू, असे आश्वासन वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी गुरूदेवभक्तांच्या शिष्टमंडळाला दिले. (जिल्हा प्रतिनिधी)