बाबुपेठ उड्डाणपुलाचे टेंडर एका महिन्यात काढा
By Admin | Updated: August 6, 2016 00:39 IST2016-08-06T00:39:53+5:302016-08-06T00:39:53+5:30
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ मध्य रेल्वे फाटक क्रमांक ४३ अ व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे फाटक क्रमांक १४३-अ या ..

बाबुपेठ उड्डाणपुलाचे टेंडर एका महिन्यात काढा
सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश : बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबूपेठ मध्य रेल्वे फाटक क्रमांक ४३ अ व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे फाटक क्रमांक १४३-अ या प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाचे टेंडर एक महिन्यात काढावे, अशा सूचना चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
विधानभवनात गुरुवारी यासंदर्भात आयोजित एका बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. यावेळी आ. नाना शामकुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त संजय काकडे हेदेखील उपस्थित होते.
उड्डाणपुलाच्या पोचमार्गामध्ये ६८ नागरिक बाधित होतात. त्यांचे पर्यायी पुनर्वसन करण्यासंदर्भात नगर विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा. त्यासाठी त्यांना लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे निर्देशही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. ते पुढे म्हणाले, या पुलाची टेंडर प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. तसेच आॅक्टोबर २०१६ मध्ये या कामाचे भूमिपूजन केले जावे. कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून उड्डानपुलाचे काम वेगाने पूर्ण करताना या पुलाच्या बांधकामासाठी उत्तमातील उत्तम कंत्राटदाराची निश्चिती करण्यात यावी. ज्या दिवशी या उड्डाणपुलाचे कार्यादेश निर्गमित होतील, त्याच दिवशी त्या पुलाच्या उदघाटनाची तारीखही निश्चित करून या प्रस्तावित पुलाच्या बांधकामाकरिता ४ एप्रिल २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूर यांनी रेल्वे प्रशासनाशी या संदर्भात चर्चा करून उड्डाणपुलाची जागा व डिझाईन निश्चित केले आहे. त्यानुसार उड्डाणपुलाचे ६१.५७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यात नियमानुसार रेल्वे त्यांच्या भागातील १६.३१ कोटी रुपयांचा खर्च उचलणार आहे. उर्वरित ४५.२६ कोटी रुपयांचा खर्च राज्य शासनास करावयाचा आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)