मनावरचा मळ ग्रंथच दूर करतात

By Admin | Updated: February 13, 2016 00:36 IST2016-02-13T00:36:49+5:302016-02-13T00:36:49+5:30

जात, धर्म, भाषा, प्रदेश, प्रांतवादाचा मळ मनाला लागू देऊ नका. या विचारांचा मळ चिकटला की माणसाचा राक्षस होतो.

Remove the moral texts from the mind | मनावरचा मळ ग्रंथच दूर करतात

मनावरचा मळ ग्रंथच दूर करतात

विठ्ठल वाघ : चंद्रपुरात ग्रंथोत्सवाचे उद्घाटन
चंद्रपूर : जात, धर्म, भाषा, प्रदेश, प्रांतवादाचा मळ मनाला लागू देऊ नका. या विचारांचा मळ चिकटला की माणसाचा राक्षस होतो. हा मळ दूर करण्याचे काम ग्रंथ च करतात, त्यामुळे ग्रंथांची सोबत सदैव करा, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ यांनी चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्र्रपूर जिल्हा ग्रंथालय संघ आणि जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीच्यावतीने तीन दिवसीय ग्रंथोत्सवाला स्थानिक ज्युबिली हायस्कूलमध्ये शुक्रवारपासून प्रारंभ झाला. त्याचे उद्घाटन विठ्ठल वाघ यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेंद्र कोरे, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, नागपूर ग्रंथालय संघाचे प्रमुख डॉ.गजानन कोट्टेवार, प्राचार्य इंगोले व मुरलीमनोहर व्यास आदी मंचावर उपस्थित होते.
या समारंभात असलेली विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावरील उपस्थिती बघून त्यांचे संपूर्ण भाषण विद्यार्थ्यांभोवती फिरले. ते म्हणाले, संस्कारित व्हा, अभ्यास करा. टिव्हीवरच्या जाहिरातींना भाळू नका. त्या फसव्या असतात. मुळातच सुंदर असणारी ऐश्वर्या राय चेहऱ्याच्या क्रिमची जाहिरात करते. दिवसागणिक गोरी पडत जाणारी त्वचा दाखविली जाते. क्रिममुळे खरेच गोरेपणा येत असे तर क्रिमचा वापर करून गोरी पडलेली एखादी म्हैस दाखवा ना, असे आवाहन त्यांनी केले. चलचित्रांवर विश्वास ठेवू नका, त्यामुळे मनातील राक्षस जागा होतो. चित्र येतात आणि जातात, ते खोलवर रूजत नाहीत. ग्रंथ मात्र मनात खोलवर रूततात, त्यामुळे त्यांचा अंगीकार करा.
मराठी जगवा आणि वाढवा असे आवाहन करून ते म्हणाले, मम्मी-पप्पा न म्हणता आईबाबा म्हणा. मराठीपण जपण्यासाठी घरातून सुरूवात करा. वाचाल तर वाचल, असे सांगून ते म्हणाले, वाचनाच्या बळावर या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण मिळाले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख मिळाले. ही सर्व माणसे खेड्यातून आलेली होती. ते प्रवाहाविरूद्ध पोहले आणि समाजाचे दीपस्तंभ झाले. त्यांचे अनुकरण करा आणि पुस्तके-गं्रथांचा आधार घेऊन मोठे व्हा.
यावेळी अनिल बोरगमवार यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक मुरलीमनोहर व्यास यांनी केले. संचालन मनीषा गिदेवार तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेंद्र्र कोरे यांनी मानले.
दरम्यान, दुपारी ‘बालसाहित्य बालकापर्यंत खरोखर पोहचत आहे काय ?’ या विषयावर चंद्रपूरच्या बाल साहित्यिक डॉ.बानो सरताज काजी यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडला.
यात गडचिरोलीचे प्रा.राज मुसणे, प्राचार्य सविता सादमवार व कोरपणाचे प्रा.सुदर्शन दिवसे यांनी मांडणी केली. (जिल्हा प्रतिनिधी)

बकरी व्हा
बकरी व्हा, असे आवाहन विठ्ठल वाघ यांनी केले. ते म्हणाले, म्हशी, गाई गवत खातात. मात्र बकरी जे दिसेल ते बकाबका खात सुटते. त्या सर्व खाद्याचे गुणधर्म तिच्या दुधात उतरतात. तिचे दूध आयुर्वेदात सर्वश्रेष्ठ मानले जाते. आयुष्यात बकरीसारखे व्हा. समोर येईल ते बकाबका वाचून काढा. आणि सर्वश्रेष्ठ ज्ञानवंत व्हा.

ग्रंथदिंडी निघाली
या तीन दिवसीय ग्रंथोत्सवाला ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातून दिंडी निघाली. यात दिंडीमध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यलायाचे विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्येने सहभागी झाले होते. दिंडीमध्ये मुलींच्या लेझीम पथकापुढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कवी विठ्ठल वाघ यांनी देखील हातात लेझीम घेऊन ठेका धरला होता.

Web Title: Remove the moral texts from the mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.