वीज खांब हटविण्याचे काम अडगळीत

By Admin | Updated: April 20, 2015 01:14 IST2015-04-20T01:14:09+5:302015-04-20T01:14:09+5:30

शहरातील अनेक रस्त्यांच्या मधोमध वीज खांब उभे असल्याने या खांबामुळे शहरात अपघात वाढून वाहतुकीची कोंडी होत आहे.

Removal of power pole is difficult | वीज खांब हटविण्याचे काम अडगळीत

वीज खांब हटविण्याचे काम अडगळीत

वरोरा : शहरातील अनेक रस्त्यांच्या मधोमध वीज खांब उभे असल्याने या खांबामुळे शहरात अपघात वाढून वाहतुकीची कोंडी होत आहे. हे वीज खांब हटविण्याकरिता जिल्हा नियोजन समितीने ४२ लाखांचा निधी दिला. परंतु वीज खांब हटविण्याचे काम मागील दोन वर्षापासून रेंगाळले आहे. परिणामी आजही वरोरा शहरातून दुचाकी व चारचाकी वाहन घेऊन जाताना रस्त्यावरील वीज खांबाचा सामना करावा लागत आहे.
वरोरा शहरातील प्रभाग-१ पोलीस ठाणे ते रेल्वे पूल, प्रभाग दोन मध्ये जाजू हॉस्पिटल ते पोलीस ठाणे, जिल्हा सहकारी बँक ते माढेळी रोड, पाण्याची टाकी ते जुने बसस्थानक, वणी नाका बायपास, विश्रामगृह ते रेल्वे पूल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते माढेळी रोड, शिवाजी चौक ते विश्रामगृहापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर एल.टी. लाईन व ११ केव्हीचे वीज खांब रस्त्याच्या मधोमध उभे आहेत. यामध्ये काही रोहीत्रांचाही समावेश आहे. शहरातील मुख्य मार्गावर विद्युत पोल असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. रात्रीच्या वेळी या खांबांवर वाहने आदळून अपघात होत आहेत. अनेकदा या खांबांना जडवाहनांची धडक बसली. त्यामुळे खांबावरील वीज तारा तुटून तासन्तास विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
याबाबत वरोरा नगरपालिकेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वीज खांब हटविण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला. तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नही केले. त्यानंतर सन २०१२-२०१३ मध्ये जिल्हा नियोजन समितीमध्ये मान्यता मिळून एलटी लाईन व ११ केव्ही लाईनचे वीज खांब हटविण्यासाठी ४२ लाख रुपये मंजूर करण्यात आले. या कामाचा प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार करुन नगरपालिकेच्यावतीने २४ एप्रिल २०१३ रोजी तांत्रिक मंजुरीसाठी तो प्रस्ताव महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर वीज वितरण कंपनीकडे न.प.ने पत्र व्यवहार केला. या कामासाठी एक वर्षापूर्वी निविदा काढून कंत्राटदाराला वर्कआॅर्डर देण्यात आली. परंतु दोन वर्षांचा कालावधी लोटूनही वरोरा शहरातील विद्युत खांब हटविण्याच्या कामाला आजपर्यंत सुरुवात करण्यात आली नाही. नगरपालिका प्रशासनाने पत्रव्यवहार व ेनिविदा काढीत कंत्राटदारांची नेमणूक केल्यानंतरही अशा कामात विलंब होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Removal of power pole is difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.