फ्लोराइडयुक्त पाण्यापासून बामणीवासीयांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:57+5:302021-03-19T04:26:57+5:30
बल्लारपूर : उन्हाचा तडाखा वाढत असतानाच शहरी भागासह बामणी गावालाही पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत होता. बल्लारपूर तालुक्यातील बामणी ...

फ्लोराइडयुक्त पाण्यापासून बामणीवासीयांची सुटका
बल्लारपूर : उन्हाचा तडाखा वाढत असतानाच शहरी भागासह बामणी गावालाही पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत होता. बल्लारपूर तालुक्यातील बामणी व लागून असलेले गाव मागील अनेक वर्षांपासून पाण्याच्या दुष्काळाने ग्रासलेले होते; परंतु या समस्येचे कायमस्वरूपी निर्मूलन होणार असून, बामणीवासीयांची फ्लोराइडयुक्त पाण्यापासून सुटका होणार आहे.
दीड हजार घरे असलेल्या बामणीत सात हजारांच्या जवळपास लोकसंख्या आहे. सर्वांची पाण्याची गरज भागविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने खनिज विकास निधीतून वॉर्ड क्रमांक २ व वॉर्ड क्रमांक ५ मध्ये शुद्ध पाण्याच्या दोन आरो मशीन लावल्या आहेत. यामधून वॉर्डातील ३०० एटीएम कार्डधारक दररोज ३ हजार लिटर पाण्याची उचल करतात. त्यांना हे पिण्याचे पाणी १ रुपयात १० लिटर, तर १० पैशात एक लिटर पडते. शुद्ध पाण्यामुळे त्यांची फ्लोराइडयुक्त पाण्यापासून सुटका झाली आहे.
याशिवाय बामणीअंतर्गत बेघर व गावात ३ विहिरी आहेत. ५८ हातपंप आहेत. वॉर्ड क्रमांक ५ मध्ये पाण्याची मागणी वाढल्यामुळे तेथे पाण्याच्या दोन टाक्या लावण्यात येत आहेत, तर अमितनगरला आरो मशीन लावण्यात येत आहे. सध्या ग्रीड नळ योजनांचे शुद्ध पाणी बामणीला मिळणार असल्यामुळे त्यासाठी गावात चार नवीन टाक्या बांधण्यात आल्या आहेत. याशिवाय जवळच्या केमतुकूमला नळ योजना आहे. केमरीठलाही पाण्याची व्यवस्था आहे. अनेकांच्या घरी बोअरवेल आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
कोट
पाणीटंचाईला दूर ठेवण्यासाठी जनतेने दैनंदिन व्यवहारात कपडे धुण्यासाठी, अंघोळीसाठी व भांडी धुण्यासाठी वापरले जाणारे पाणी काटकसर करूनच वापरावे.
-सुभाष ताजने, सरपंच, ग्रामपंचायत, बामणी