वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडा
By Admin | Updated: August 4, 2015 00:40 IST2015-08-04T00:40:55+5:302015-08-04T00:40:55+5:30
खरीप हंगामाला सुरूवात झाली असता जुनमध्ये आलेल्या पावसामुळे सावली तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली.

वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडा
आढावा बैठक : विजय वडेट्टीवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
सावली : खरीप हंगामाला सुरूवात झाली असता जुनमध्ये आलेल्या पावसामुळे सावली तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना आता पाण्याची नितांत आवश्यकता असल्याने वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे चारही पंप सुरू करून येत्या महिनाभरात शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्या, अशी सूचना माजी राज्यमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी सावली तालुक्यातील वाघोली बुटी येथे घेतलेल्या सिंचन विभागाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना केली.
आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथील अधिवेशनाचे कामकाज सोडून गेल्या तीन दिवसांपासून सावली तालुक्यातील अनेक गावांचा दौरा केला. पावसाअभावी शेतातील धानाचे पऱ्हे सुकू लागले असून ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी धानासोबतच सोयाबीन, तूर यासह अनेक पिकांची वाईट परिस्थिती आहे.
सदर दौऱ्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी पाण्याबाबत आपली व्यथा मांंडली. त्यामुळे वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेच्या चारही पंपाद्वारे चार हजार हेक्टर शेतीचे सिंचन होणार असल्याने सर्व नहर, कालव्यांची युद्धपातळीवर यंत्रणेच्या साहाय्याने दुरुस्ती करावी. पाणी कुठेही अडणार नाही, याची काळजी घेऊन सर्व शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, यात कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करता महिनाभराच्या आत वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे चारही पंप सुरू करून त्याद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
सर्व शेतकऱ्यांना शेतीसाठी लवकरच वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेच्या चारही पंंपाद्वारे पाणी उपलब्ध होणार असून सिंचन विभागातील यांत्रिकी विभाग, लघुपाटबंधारे विभाग, मध्यम पाटबंंधारे विभाग यासह गोसखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची बैठक सावली तालुक्यातील वाघोली बुटी येथील उपसा सिंचन विभागाच्या कार्यालयात आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आत्रामम, गोसेखुर्द प्रकल्प आसोला मेंढा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सोनवणे, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता भाके यांच्यासह उपविभागीय अभियंता उपस्थित होते.
या बैठकीत अधिकाऱ्यांनी आसोलामेंढा तलावात उपलब्ध असलेल्या पाण्यासह वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेविषयी माहिती दिली. या बैठकीला जलसंपदा विभाग तसेच अन्य विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)